धनश्री पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी पती,पत्नी अटकेत

श्रीगोंदा /प्रतिनिधी/-तालुक्यातील काष्टी येथील धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत 34 लाखांचा गैरव्यवहार प्रकरणी आरोपी असणारे संस्थेच्या अध्यक्षा ज्योती रमेश गवळी व त्यांचे कलेक्शन एजंट पती रमेश सर्जेराव गवळी यांना पोलिसांनी हडपसर पुणे येथून अटक केली आहे. 


या पतसंस्थेत काही दिवसांपूर्वी 34 लाखांचा गैरव्यवहाराचा प्रकार घडला होता. या संस्थेच्या चेअरमन असणारी पत्नी व याच सहकारी पतसंस्थेचा कलेक्शन एजंट असणारा त्या चेअरमन महिलेचा पति या दोघांनी मिळून अनेक सभासदांना लाखो रुपयांचा गंडा घातला होता. या पती- पत्नीने मुदत ठेवींवर मोठे व्याजदर देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांच्या मुदत ठेवी जमा करून घेतल्या. 

 आणि प्रत्यक्षात या मुदत ठेवींची एक वर्षाची मुदत पूर्ण झाल्यावर काही ठेवीदारांनी त्यांचे पैसे परत मागायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना पैसे देण्यास नकार दिला होता. आर्थिक फसवणूक करून वरून त्यांनाच पुन्हा सावकारी गुन्ह्यात अडकवण्याची धमकी हे ठकसेन पती पत्नी या सभासदांना देत होते.त्यामुळे अंबादास भानुदास राहिंज( रा. काष्टी,(नेत्र चिकित्सक कर्जत उपजिल्हा रुग्णालय)यांनी या फसवणुकीविरोधात श्रीगोंदा पोलिसांकडे तक्रार करून दाद मागितली होती. 

श्रीगोंदा पो. निरीक्षक बाजीराव पोवार यांनी देखील तात्काळ या पतसंस्थेच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व संचालक मंडळ तथा कलेक्शन एजंट या सर्वांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेतला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीना पकडण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या त्यानुसार आज श्रीगोंदा पोलिसांनी या संस्थेच्या चेअरमन सौ ज्योती रमेश गवळी, व कलेक्शन एजंट काम करणारे ज्योती यांचे पती रमेश सर्जेराव गवळी या दोघांना आज हडपसर पुणे येथून अटक केल्याची माहिती पो. निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दिली