चंद्रपुरात दामदुपटीच्या नावाखाली गुंतवणूकदारांची फसवणूक
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील सुनील नामदेव नैताम याने कंपनीत पैसे गुंतविले होते. परंतु, मुदतीनंतरही रक्कम मिळाली नाही. त्यांनी वारंवार पैशाबाबत विचारणा केली. मात्र, रक्कम परत करण्याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने त्याने शहर पोलीस ठाणे गाठून २४ नोव्हेंबर रोजी संचालक योगेश रेहपाडे आणि अन्य १३ संचालकांविरुद्ध तक्रार दिली.
परंतु, शहर पोलिसांनीही हे प्रकरण थंडबस्त्यात ठेवले. यानंतर नैताम आर्थिक गुन्हे शाखा गाठून तक्रार दिली. आर्थिक गुन्हे शाखेने सुनील नैताम याच्या तक्रारीच्या आधारे चौकशी केली. यानंतर शहर पोलिसांना प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे सांगितले. यानंतर कंपनीच्या संचालकांवर कलम ४०६, ४०९, ४२०, ३४ आणि महाराष्ट्र ठेवीदाराचे हितसंरक्षण अधिनियम १९९९ च्या सहकलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
३ डिसेंबरपासून हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले. या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून त्यांनी गुंतविलेल्या रकमेची माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक टेडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक चांदेकर करीत आहेत.
Post Comment