Breaking News

शेती, सिंचनाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राज्य शासन सज्ज.

नागपूर, दि. १० : विदर्भ, मराठवाडा तसेच राज्यातील अन्य भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न, सिंचनाचे प्रश्न याची सोडवणूक करण्यास हिवाळी अधिवेशनासाठी राज्य शासन सज्ज आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत साधारण ४१ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी १९ हजार कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली असून शेवटच्या पात्र शेतकऱ्यास कर्जामाफीचा लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरु ठेवली जाईल. 


बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना तीन पद्धतीने नुकसानभरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकऱ्यांना देखील नुकसानभरपाई दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज्य मंत्रीमंडळातील सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, यंदा धान, ज्वारी, उडीद, सोयाबीन, कापूस या पिकांची आवक वाढली असून केंद्र शासनाने विविध आयात-निर्यात धोरणांमध्ये महत्वपूर्ण बदल केल्याने विविध शेतमालास मिळणाऱ्या भावातही चांगली सुधारणा झाली आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरअखेर धानाची आवक ३३.७१ लाख क्विंटल इतकी होती, ती यावर्षी वाढून ४२.५२ लाख क्विंटल इतकी झाली आहे. 

त्याचबरोबर ज्वारी २५ लाख क्विंटल, मूग ७.७९ लाख क्विंटल, उडीद ८ लाख क्विंटल, सोयाबीन १६१ लाख क्विंटल एवढी आवक वाढली आहे. कापसाचे गेल्यावर्षी डिसेंबरच्या अखेरपर्यंत ७०.४६ लाख क्विंटल एवढे उत्पादन होते. यावर्षी डिसेंबरच्या सुरुवातीलाच 52 लाख क्विंटल इतकी आवक झाली आहे. कापसाच्या पहिल्या दोन वेचण्यांमध्ये मागील वर्षीपेक्षा वाढ झाली आहे. तिसऱ्या वेचणीच्या वेळेसही काही क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.