Breaking News

प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या अभ्यासगटावर गाडे


राहुरी प्रतिनिधी-अहमदनगर जिल्ह्यातील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना यशस्वीरीत्या चालाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या अभ्यास गटावर निमंत्रित सदस्य म्हणून बारागाव नांदूर व इतर चौदा गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष व जि. प. सदस्य शिवाजीराजे गाडे यांची निवड करण्यात आली.

 गाडे यांनी बारागाव नांदूर व इतर चौदा गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना यशस्वीरित्या चालवून योजनेच्या व्यवस्थापनाचा राज्यातच नव्हे तर देशात आदर्श निर्माण करून दिला आहे. राहुरी तालुक्यातील मुळानदी काठच्या सोळा गावांना या योजनेतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.

 राज्यात सुरळीत चालणारी व नफ्यात असणारी ही एकमेव पाणीपुरवठा योजना असून या योजनेच्या व्यवस्थापनाचे केंद्रातील पाणीपुरवठा विभागाने पाहणी करून कौतूक केलेले आहे. जि. प. चे मुख्य कार्यकारी विश्वजीत माने यांनी त्यांची ही निवड केली असून गाडे यांचे या निवडीबद्दल अभिनंदन होत आहे.