Breaking News

प्लास्टिक पिशवी विक्रेत्यांच्या बैठकीत चर्चा


कोपरगांव /प्रतिनिधी-शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, उपनगराध्यक्ष विजयराव वाजे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या होलसेल प्लास्टिक पिशवी विक्रेत्यांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. प्लास्टिक पिशवी मुक्त शहर करण्याबाबत नगरपरिषदेमार्फत शहरातील व्यापाऱ्यांना जाहीर सूचना करण्यात आल्या.
यामध्ये दुकानातील ५० मायक्रॉनपेक्षा कमी असलेल्या प्लास्टिक पिशव्या दि. ३१ डिसेंबरपर्यंतच वापरणे, दि.१ जानेवारीपासून ५० मायक्रॉनपेक्षा कमी असलेल्या प्लास्टिक पिशवी बंद करण्यात येणार असून या पिशवीसंदर्भात देवाण-घेवाण न करणे आदींसह अनेक सूचनांचा समावेश आहे. दरम्यान, नगराध्यक्ष वहाडणे म्हणाले, की अशा पिशव्यांमुळे शहराच्या पर्यावरणास धोका निर्माण होऊन शहरातील नाले, गटारी तुंबतात. परिसरात दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरून डासांचे प्रमाण वाढते.


 तसेच असे प्लास्टिक खाऊन जनावरे दगावतात. दि. १ जानेवारीनंतर ज्या व्यापाऱ्यांकडे अथवा दुकानदारांकडे प्लास्टिक पिशव्या आढळून आल्यास नगरपरिषदेमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येईल. नगरपरिषदेच्या या आवाहनास चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊ, अशी ग्वाही शहरातील होलसेल कॅरिबॅग विक्रेत्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी शहरातील होलसेल प्लास्टिक पिशवी विक्रेते उमेश पहाडे, बंटी ठोळे, सागर लाहोटी, सुनील गड्डा, संदीप डागा, अजित होडे, प्रमोद दाभाडे आदींसह अनेक व्यापारी उपस्थित होते.