Breaking News

शिक्षक भरतीचे जि.प. भवनासमोर लाक्षणिक उपोषण

सिंधुदुर्गनगरी, दि. 17, डिसेंबर - आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेकडून शिक्षकांना कार्यमुक्त केले जात नसल्याने शिक्षक भारती संघटनेने आंदोलन करत आज शनिवारी जिल्हा परिषद भवनासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही शिक्षक भारती संघटनेने दिला आहे.


पती पत्नी शिक्षक वेगवेगळ्या जिल्ह्यात आहेत. पती पत्नी पैकी एकाचीच बदली यापूर्वी झालेली असेल अशा शिक्षकाच्या आंतर जिल्हा बदल्या करून तात्काळ कार्यमुक्त करावे असे शासन आदेश आहेत. त्याप्रमाणे जिल्ह्यात 336 शिक्षकांच्या बदल्या झाल्या पण त्या पैकी 200 शिक्षकांना अद्याप कार्यमुक्त केलेले नाही. जि.प. कडून चालढकल केली जाते आहे. त्यासाठी अखेर लाक्षणिक उपोषणाचे आंदोलन कराव लागल्याच शिक्षकांनी स्पष्ट केले.


दरम्यान उपोषण सुरू असताना जि.प. चे गटनेते सतिश सावंत यांनी उपोषण स्थळी भेट देऊन शिक्षकांशी संवाद साधला. आंतर जिल्हा बदली शिक्षकांना कार्यमुक्त करण्यासाठी शिक्षण समिती सभेत प्रश्‍न मांडून सोडविला जाईल असे आश्‍वासन दिले.