Breaking News

बियाणे कंपन्यांकडून नुकसान भरपाई घ्या : तिवारी

मुंबई : राज्यात बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकरी, नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकर्‍यांना कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी जाहीर केलेल्या ऐतिहासिक मदतीनंतर सध्या सुमारे दहा लाखावर कापुस उत्पादक शेतकर्‍यांनी अमेरिकेच्या मोसॅन्ट्रोसह भारतातील सर्व कापुस बियाणे कंपन्यांविरुद्ध रीतसर नुकसान भरपाईची तक्रार केली असून बहुराष्ट्रीय बियाणे कंपन्यांच्या एकाधिकार व जागतिक शोषणाविरुद्ध हा जागतिक स्तरावर सर्वात मोठा लढा असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शेतकरी आपली स्वातंत्र्याची व अधिकाराची लढाई जिंकणार असा विश्‍वास कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केला आहे. 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या घोषणेप्रमाणे कोरडवाहू कापूस उत्पादकास शेंदरी बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी एनडीआरएफमार्फत 6 हजार 800 रुपये, पीक विमा 8 हजार रुपये व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत कंपन्यांकडून मिळणारी 16 हजार रुपयांची मदत दिली जाईल. अशी एकूण साधारण 30 हजार 800 रुपये इतकी प्रति हेक्टरी मदत बोंडअळीग्रस्त कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकर्‍यास देण्यात येईल. बागायत कापूस उत्पादक शेतकर्‍यास एनडीआरएफमार्फत 13 हजार 500 रुपये, पीक विमा 8 हजार रुपये व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत कंपन्यांकडून मिळणारी 16 हजार रुपयांची मदत दिली जाईल. अशी एकूण साधारण 37 हजार 500 रुपये इतकी प्रति हेक्टरी मदत बोंडअळीग्रस्त बागायती कापूस उत्पादक शेतकर्‍यास देण्यात येईल मात्र बियाणे कंपन्या नुकसान भरपाई न देता न्यायालयात जातील असा युक्तिवाद करूनही मदतच मिळणार नाही असा आर्थिक अडचणीत असलेल्या नैर्‍याशग्रस्त कापूस उत्पादक शेतकर्‍यांमध्ये भ्रम निर्माण करणार्‍या बातम्यांवर किशोर तिवारी यांनी आक्षेप घेत मागील तेरा वर्षांमध्ये अमेरिकेच्या मोसॅन्ट्रोसह भारतातील सर्व कापुस बियाणे कंपन्यांनी बी टी कापसाचे बियाणामध्ये विषारी जिन टाकुन 250 रुपयाचा संकरीत कापसाच्या बियाणांचा भाव सुरूवातीला रु 1150 व नंतर रु 850 प्रती पाकीट विकुन हजारो कोटींची कमाई केली असून आता बी टी बियाणे बोंडअळी रक्षक राहिले नसून कापुस बियाणे कंपन्यांनी केलेले सर्व दावे फोल ठरल्यामुळे महाराष्ट्राच्या कापूस बियाणे गुणवत्ता नियंत्रण कायद्यांतर्गत नुकसान भरपाई देणे कायद्याने देणे गरजेचे असल्याने यावर शंका घेणे चुकीचे असून महाराष्ट्र सरकारने अमेरिकेच्या मोसॅन्ट्रोसह भारतातील सर्व कापुस बियाणे कंपन्यांविरुद्ध त्यांच्या सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या शोषणाविरुद्धच्या लढ्यात शामिल होण्याचे आवाहनच तिवारी यांनी सर्व टीकाकारांना केले आहे .