Breaking News

खिलाडू वृत्तीतून समानता जोपासावी : जब्बार पटेल

पुणे: ‘एकता हे देशापुढील मोठे आव्हान असून प्रदेश, धर्म, जात, लिंग या घटकांमध्ये समानता राखून सर्व नागरिकांनी राज्य घटनेचा सन्मान केला पाहिजे. खेळातील खिलाडू वृत्तीतून प्रत्येकाने इतरांचा आदर केला पाहिजे व खिलाडू वृत्तीनेच तत्वासाठी झगडावे. प्रत्येक खेळाडूने खेळाप्रमाणेच कोणत्यातरी एका कलेचा छंद जोपासावा. नाद, ताल, माधुर्य यांचे समायोजन करुन खेळाचा उत्सव साजरा करावा’ असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी शनिवारी व्यक्त केले. 


पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आधारस्तंभ माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभूषण शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारह श्री शिवछत्रपती आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धांचे उद्घाटन जेष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्या व बारामती हायटेक टेक्स प्रा.लि.च्या चेअरमन सुनेत्रा पवार होत्या. 

पै. अभिजित कटके यांचा महाराष्ट्र केसरी किताब मिळवल्याबद्दल संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. स्पर्धेत सहभागी होणा-या सर्व खेळाडूंनी शपथ घेतली. सर्व खेळाडू, स्काऊट, राष्ट्रीय छात्र सैनिकांच्या शानदार संचालन, बहारदार सांकृतिक कार्यक्रम, योगासनाची चित्तथरारक प्रात्यक्षिकांच्या सादरीकरणाने स्पर्धेस सुरुवात झाली. 

अ‍ॅड. कदम म्हणाले की, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा शैक्षणिक विकास व क्रीडा कौशल्याचा विकास व्हावा यासाठी संस्थेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या संकल्पनेतून पद्मविभूषण शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धांचे आयोजन केले जाते. संस्थेच्या विविध शाखांमधून शिक्षण घेत असलेले अनेक विद्यार्थी-खेळाडू राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धांमधून यश संपादन करीत आहेत. या स्पर्धा सुरु झाल्यापासून आजतागयत श्रीलंका, मॉस्को, सिंगापूर, नेपाळ, दक्षिण आफ्रिका, बँकॉक, थायलंड इत्यादी राष्ट्रांमध्ये खेळाडूंनी विविध स्पर्धांमधून आंतरराष्ट्रीय पातळीवर 15 सुवर्ण पदके, 2 रौप्य, 6 कास्य पदके व 39 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला तर राष्ट्रीय पातळीवर 48 सुवर्ण पदके, 10 रौप्य, 22 कास्य पदके व 119 स्पर्धकांनी सहभाग नोंदवत चमकदार कामगिरी केली आहे.