Breaking News

सुब्रतो रॉय यांची शेकडो एकर जमीन ताब्यात

सातारा : पुण्यातील अ‍ॅम्बी व्हॅलीप्रकरणी सहारा ग्रुपचे मालक सुब्रतो रॉय यांना सर्वोच्च न्यायालयाने आणखी एक दणका दिला आहे. महाबळेश्‍वर तालुक्यातील दाबे डोंगर पठारावरील दोन टेबल लँडवरील त्यांची शेकडो एकर जमीन ताब्यात घेतली आहे. याबाबतचा फलकही संबंधित जागांवर लावण्यात आला आहे. 

आठवड्यापूर्वी मोठ्या पोलिस बंदोबस्तात महसूल विभाग व उच्च न्यायालयाच्या यंत्रणेने महाबळेश्‍वर तालुक्यातील दाबे पठारावर मोठा फलक उभा करून जप्तीचे आदेश पारित केले आहेत. सातारा महसूल व पोलिस यंत्रणेने हे फ्लेक्स लावले असून दोन शेकडो एकराचे डोंगर ताब्यात घेतले आहेत. ही कारवाई अत्यंत गोपनीय असल्याने याची खबर कुणालाही समजली नाही. 

दरम्यान, सहारा ग्रुपने मध्यंतरीच्या काळात देश, विदेशात अनेक ठिकाणी जमीन खरेदीचा सपाटा लावला होता. नागरिकांचे पैसे न दिल्याने सुप्रीम कोर्टाने रॉय यांच्या मालमत्ता जप्तीचा सपाटा लावला आहे. यापूर्वी जावली, महाबळेश्‍वर, पाटण आणि म्हसवड या भागातील जमिनीवर यापूर्वीच जप्तीचे आदेश देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.