बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नगर तालुका राष्ट्रवादीचे सार्वजनिक बांधकाम विभागावर हल्लाबोल

अहमदनगर (प्रतिनिधी)- बाह्यवळण रस्त्याची तातडीने दुरुस्ती होण्याच्या मागणीसाठी नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागावर हल्लबोल आंदोलन करुन, अधिकार्‍यांना घेराव घालण्यात आला. कार्यकारी अभियंता अंकुश पालवे व शाखा अभियंता रमेश ढोबळे यांच्याशी सदर प्रश्‍नावर चर्चा करण्यात आली असता, त्यांनी दि.1 जानेवारी च्या आत रस्त्याचे काम सुरु करण्याचे आश्‍वासन दिले.
नगर तालुकाध्यक्ष गहिनीनाथ (दादा) दरेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या हल्लाबोल आंदोलनात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, अशोक कोकाटे, श्याम कांबळे, भास्कर मगर, गोरख सुपेकर, आबासाहेब सोनवणे, विद्या भोर, सुहास कासार, अनिल नरवडे, दादा शिंदे, सागर खेंगट, देवीदास टेमकर, ओमकार गोंडळकर सहभागी झाले होते.
वाळूंज बायपास ते निंबळक मार्गे विळद घाट पर्यंन्त बाह्यवळण रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून, ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहे. यामुळे या रस्त्यावर अनेक लहान मोठे अपघात घडत असून, जीव मुठीत धरुन वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे. तसेच वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हा रस्ता खराब असल्याने अनेक अवडज वाहने शहरात शिरत असून, वाहतुक कोंडीचा व अपघाताचा प्रश्‍न निर्माण होत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. तातडीने सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याची मागणी आंदोलकांनी केली.
गहिनीनाथ दरेकर यांनी रस्ता दुरुस्तीच्या कामात अडथळा निर्माण झाल्यास काम पुर्ण होण्यासाठी राष्ट्रवादी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पाठिशी उभी राहणार आहे. मात्र चालू वर्षी काम सुरु न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोको आंदोलनाने नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा इशारा त्यांनी दिला.