गर्भपात करणार्या डॉक्टरवरही गुन्हा दाखल
सोलापूर जिल्ह्यातील मंद्रुप तालुक्यात माजी सरपंच आणि त्याच्या मुलाने तरुणीवर अत्याचार करून तिचा गर्भपात केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वांगी गावचे माजी सरपंच शब्बीर मुल्ला व त्याच्या मुलासह एका अज्ञात डॉक्टरविरुद्ध मंद्रुप पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून अझरोद्दीनला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मंद्रुपमधील महिलांसोबत मुल्लाच्या वांगी येथील शेतात आईसोबत कामाला जात होती.
शब्बीर यातील महिलांना शेतातील कामांसोबतच घरातील कामेही करायला लावायचा. त्याने एकेदिवशी युवतीला घरी कामासाठी बोलावून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. या प्रकाराची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी देत 2011 ते डिसेंबर 2017 या काळात दोघांनी तिच्यावर सातत्याने अत्याचार केला.काही दिवसांनी शब्बीरने पीडितेला मुलगा अझरोद्दीनसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले. तिने नकार देताच शरीरसंबंधाचे व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी दिली. सोबतच आपल्या पत्नीला ज्याप्रमाणे मारून नदीत फेकले त्याचप्रमाणे जिवे मारण्याची धमकीही दिली.
त्यानंतर बापलेकांनी पीडितेवर अनेकदा अत्याचार केला. दरम्यान, पीडिता गर्भवती राहिली आणि गर्भपात करून टाकण्यासाठी दबाव टाकला. एकेदिवशी पीडिता मंद्रुपच्या घरी एकटी असताना खासगी डॉक्टरला बोलावून मुल्ला यांनी तिचा गर्भपात केला. याप्रकरणी अझरोद्दीन मुल्लाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून शब्बीर मुल्ला फरार झाला आहे. मुल्ला व डॉक्टरचा पोलिस शोध घेत आहेत.