Breaking News

महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे कमला मील दुर्घटना-सचिन अहिर

मुंबई, - कमला मिलमध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये होरपळून 14 लोकांचा मृत्यू झाला असून या घटनास्थळाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष स चिन अहिर यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान या घटनेची सखोल चौकशी करुन संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी अहिर यांनी केली आहे.

कमला मिलच्या कंपाऊंडमधील 1 अबव्ह रेस्टॉरंट आणि पबला मध्यरात्री भीषण आग लागली आणि त्यामध्ये 14 लोकांचा नाहक मृत्यू झाला असून 22 लोक गंभीर आहेत. शिवाय यामध्ये काहीजण मृत्युशी झुंज देत आहेत. सरत्या वर्षात लागलेल्या या भीषण आगीच्या घटनास्थळाला तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी भेट देऊन पाहणी केली. या पबबाबत स्थानिक लोकांच्या मोठया प्रमाणात तक्रारी होत्या. या परिसरामध्ये अवैध बांधकामेही असून फायरच्या नियमांचेही उल्लंघन केले गेले आहे. परंतु मुंबई महानगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने हा भीषण प्रकार घडला असून यामध्ये पबमालकावर गुन्हा दाखल कराच परंतु महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांवरही गुन्हा दाखल करावा अशी मागणीही सचिन अहिर यांनी केली आहे.