Breaking News

सांगलीत लाचखोर तलाठ्याला अटक

सांगली, दि. 30, डिसेंबर - गावदप्तरी नोंद घालून सातबारा उतारा देण्याकरिता चार हजार रूपयांची लाच स्वीकारताना अलकूड (एस) येथील गावकामगार तलाठी भारत बापू लोटे (वय 48, रा. सेना मंदिरानजीक, विश्‍वविजय चौक, गावभाग, सांगली) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी सापळा रचून रंगेहाथ अटक केली.

कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकूड (एस) येथील तक्रारदार याच्या वडिलांनी त्यांच्या वाट्याची काही शेतजमिन त्यांच्यासह त्यांचा भाऊ व आई यांना बक्षिसपत्राद्वारे दिली होती. या शेतजमिनीची गावदप्तरी नोंद घालून सातबारा उतारा देण्याकरिता तक्रारदार यांनी भारत लोटे याची भेट घेतली होती. त्यावेळी भारत लोटे याने तक्रारदार यांच्याकडे या तीनही बक्षिसपत्राची नोंद पुस्तकात घेऊन सातबारा उतारा देण्याकरिता दहा हजार रूपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर या दोघात तडजोड होऊन प्रथम सहा हजार, तर नंतर चार हजार रूपये देण्याचे ठरले होते.


याबाबत संबंधित तक्रारदाराने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे भारत लोटे याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची खातरजमा केली असता भारत लोटे याने संबंधिताकडे लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले होते. या दोघात ठरल्यानुसार शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास कवठेमहांकाळ तहसिल कार्यालय परिसरात तक्रारदाराकडून चार हजार रूपयांची लाच घेताना भारत लोटे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.