Breaking News

कुणकेश्‍वर मंदिर परिसरातील विकासकामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

सिंधुदुर्गनगरी, दि. 13, डिसेंबर - गावोगावच्या देवी देवतांच्या साक्षीने व लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत 13 फेब्रुवारी 2018 रोजी कोकणकाशी म्हणून संबोधल्या जाणा-या श्री क्षेत्र कुणकेश्‍वर येथे महाशिवरात्री निमित्त यात्रा संपन्न होत आहे. परंतु मंदिर परिसरातील विकासकामांकडे प्रशासनाकडून होत असलेला दुर्लक्ष पाहता यात्रेच्या निमित्ताने मात्र दरवर्षी होत असलेल्या यात्रा नियोजन बैठकांचे नेमके फलित काय? असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.


दक्षिण कोकणची काशी म्हणून श्री क्षेत्र कुणकेश्‍वरची ख्याती सर्वदूर पसरली आहे. महाशिवरात्री निमित्त भरणार्‍या यात्रेबरोबरच इतर दिवसातही कुणकेश्‍वरला भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या अगणित आहे. कुणकेश्‍वरमध्ये लाखोंच्या संख्येने येणार्‍या भाविक व पर्यटकांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात व यात्रा निर्विघ्न पार पडावी याकरता ग्रामपंचायत, देवस्थान ट ्रस्ट, मुंबई सेवा मंडळ, गावातील ग्रामस्थ व जिल्हा प्रशासन एकत्र येवून दरवर्षी यात्रा नियोजन संदर्भात बैठक घेतात. या बैठकांमध्ये श्री देव कुणकेश्‍वर मंदिर परिसरातील विविध विकासकामांवर चर्चा होते. हि कामे यात्रे पूर्वी पूर्ण केली जातील अशी आश्‍वासनेही प्रशासनाकडून दिली जातात. परंतु कामांची पूर्तता मात्र प्रत्यक्षात कुठेच झालेली दिसत नाही, हि खरी शोकांतिका.


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या कुणकेश्‍वर मंदिर ते पर्यटन संकुलला जोडलेल्या रस्त्याशेजारी वाहनतळाचे काम आजही अर्धवट स्थितीत आहे. मं दिराच्या समुद्र तटालगत संरक्षक भिंतीला लागून समुद्रकिनारी उतरण्यासाठी पायर्यांचे आर. सी. सी. बांधकाम करणे गरजेचे असून मागील 3 वर्ष याबाबत वारंवार पाठपुरवा करू नही प्रत्यक्षात मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचेच दिसून येत आहे. पायर्यांच्या बांधकामाला मंजुरी मिळाली असून या कामाचे टेंडरहि निघाले आहे. परंतु प्रत्यक्षात काम कधी सुरु होणार आहे हे संबंधित प्रशासनालाच ठावूक..! त्याचप्रमाणे मंदिर परिसराचे उर्वरित फ्लोरिंग व सुशोभीकरणाचे कामहि शिल्लक आहे. 

भाविक यात्रेकरूना कुणकेश्‍वर तीर्थक्षेत्री धार्मिक विधी करण्याकरता शेड बांधण्यात यावी, समुद्रकिनारी भाविकांच्या सुखसोई करता महिला व पुरुषांसाठी एक मजली स्वच्छतागृह उभारण्यात यावे, कुणकेश्‍वर गावातील संपूर्ण यात्रा परिसर ते मंदिर पर्यंतच्या वीजवाहिन्या शासन निधीतून ‘अंडर ग्राऊंड’ करणे, पाणीपुरवठा विभागाशी संबंधित असलेली कुणकेश्‍वर देवस्थान करिता स्वतंत्र पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे, मंदिर परिसर सभोवार कामस्वरूपी विद्युत व्यवस्था उभी करणे, मंदिराचे समुद्रकिनारी तटबंदीलगत मोकळ्या जागी पर्यटकांसाठी बैठक व्यवस्था करणे, देवस्थानचे संपूर्ण जागेसाभोवार सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षक तटबंदी भिंत उभारणे, मंदिराच्या मागील बाजूस सनसेट पोईट तयार करणे व याठिकाणी छपरासहित पर्यटकांसाठी बैठक व्यवस्था करणे यासंसारख्या कित्येक मागण्या आजही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. 

यात्रा जवळ आली की जिल्ह्यातील प्रशासनाच्या सर्व खात्यांचे वरिष्ठ अधिकारी झाडून कुणकेश्‍वरमध्ये दाखल होत असतात. प्रत्येक वर्षी यात्रा नियोजनाच्या सभा सुद्धा होतात. परंतु या यात्रा नियोजन सभेच्या निमित्ताने मंदिर परिसरातील विकासकामांशी संबं धित जे विषय हाताळले जातात ते प्रशासकीय पातळीवरून खरच मार्गी लागतायत का? प्रत्येक वर्षीच्या यात्रा नियोजन बैठकांमध्ये त्याच- त्याच विकासकामांची निवेदन देण्याची वेळ देवस्थान ट्रस्ट वर का येत आहे? वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून या विकासकामांना वाटण्याच्याच अक्षता का मिळत आहेत? जिथे प्रश्‍न तयार होतो तिथे उत्तर हे असतेच. त्यामुळे यावर्षीच्या यात्रा नियोजन बैठकीपूर्वी तरी हि कामे मंजूर होवून पूर्ण करण्याची सुबुद्धी मिळवी अशीच प्रार्थना संबंधितांनी केली आहे.