Breaking News

जव्हार नगरपरिषदेची निवडणूक लांबली.

पालघर, दि. 13, डिसेंबर - डहाणू नगरपरिषदेच्या निवडणूक अधिकारी आचल गोयल (आयएएस) यांनी छाननीच्या वेळी काही उमेदवारांचे अर्ज चुकीच्या रितीने बाद ठरविले व न्यायालयाने ते वैध ठरविल्यामुळेच डहाणू व जव्हार येथील नगरपरिषदांचे मतदान निवडणूक आयोगाला चार दिवस पुढे ढकलावे लागले. असाच प्रकार तळोदा नगरपरिषदेच्या बाबतीतही घडला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले होते, त्यानुसार 13 डिसेंबर ही मतदानाची तारिख निश्‍चित करण्यात आली होती, मात्र जव्हार, डहाणू व तळोदा या नगर परिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकायांनी घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णया विरूध्द उमेदवारांनी न्यायालयात अपील दाखल केले होते. यामध्ये डहाणूच्या निवडणूक निर्णय अधिकारी भा.प्र.से. आचल गोयल यांनी डहाणू नगर परिषद निवडणुकीत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना छाननीत बाद ठरविले होते, या निर्णया विरूध्द त्यांनी न्यायालयात धाव घेतली, अखेर न्यायालयाने उमेदवारांच्या बाजूने निर्णय दिल्यामुळे या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. 

मात्र न्यायालयाचा निर्णय उशीरा लागल्यामुळे या उमेदवारांना नियमानुसार प्रचार करण्यास वेळच मिळाला नाही. तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रचाराचा वेळ मिळणे अपेक्षित होते, त्यामुळे अखेर राज्य निवडणूक आयोगाने 8 डिसेंबर रोजी नविन आदेश जारी करून 13 डिसेंबरचे मतदान 17 डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला. मात्र या सर्व प्रक्रियेत राजकीय पक्षांचे पदाधिकारी, उमेदवार, प्रशासन आदींना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे.