Breaking News

अपघातग्रस्ताचा मृतदेह दीडतास रस्त्यावरच



पुणे : गाडीवरुन पडलेले पोते उचलण्यासाठी गेलेल्या इसमाचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला आहे. ही घटना आज (रविवार) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. मात्र दुपारी एक वाजेपर्यंत पोलिसांच्या हद्दीच्या वादामुळे आणि रुग्णवाहीका न आल्याने मृतदेह जागेवरच पडून राहीला.

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, नेहरुनगरवरुन लांडेवाडी कडे जाणा-या रस्त्यावर पंडीत अॅटो समोर आज सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. मयत इसम त्याच्या मुलासह दुचाकीवरुन जात होता. त्यांचा मुलगा गाडी चालवत होता तर वडीलांच्या मांडीवरती पोते होते. 


गाडीवरुन पोते खाली पडले मात्र गाडी तशीच पुढे गेली. हे समजताच मुलाने गाडी थांबवली व वडील पोते घेण्यासाठी खाली उतरले. यावेळी समोरुन एक ट्रक आला मात्र ट्रक चालकाने समोरचा माणूस दिसत असतानाही तसाच ट्रक त्याच्या बाजूने नेण्याचा प्रयत्न केला. 

यामध्ये ट्रकचे मागचे चाक संबंधीत इसमाच्या डोक्यावरुन गेले व त्यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. मात्र एक वाजेपर्यंत पोलीस आणि रुग्णवाहीका न येवू शकल्याने मृतदेह रस्त्यावरच पडून होता. 

अखेर नागरीकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन याची माहिती दिली. नियंत्रण कक्षातून फोन गेल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी एक तासानंतर घटनास्थळी आले. या घडलेल्या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.