Breaking News

महाराष्ट्र भ्रष्टाचारात पहिला का आहे ? याचे उत्तर चिक्की घोटाळ्याच्या चौकशीवरून लक्षात येत !


मुंबई : सलग तिस-या वर्षी महाराष्ट्र भ्रष्टाचारात पहिला का आहे ? याचे उत्तर चिक्की घोटाळ्याच्या चौकशीवरून लक्षात येत आहे, अशी टीका करून काँग्रेस पक्ष या भयंकर घोटाळ्याचा सतत पाठपुरावा करत राहून दोषींना शासन होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.
चिक्की घोटाळ्याप्रकरणी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना दिलेल्या क्लीन चीटवर प्रतिक्रिया देताना सावंत म्हणाले की, बोलताना राज्यातले सरकार ‘क्लीन-चीटर’ सरकार आहे. ज्यांनी भ्रष्टाचार केला. ज्यांच्याविरोधात तक्रार केली, लाचलुचपत विभागाने त्यांचाच अभिप्राय घेतला. स्वतःच चोरी केलेल्या चोराच्या साक्षीवर एसीबीने या प्रकरणी क्लीन चीट दिली आहे. या खरेदीत प्रचंड मोठा भ्रष्टाचार तसेच नियमांची पायमल्ली झाली असून या संदर्भातले पुरावे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देऊन सखोल चौकशीची मागणी काँग्रेस पक्षाने केली होती. 

या तक्रारीनंतर दोन वर्ष उलटल्यानंतरही या विभागाने काहीही कारवाई केली नव्हती. फक्त महिला व बाल कल्याण विभागाकडे ही तक्रार पाठवण्यात आली असून, त्यांच्याकडून अभिप्राय मागवण्यात येत असल्याचे उत्तर भष्ट्राचार विरोधी पथकाकडून देण्यात आले आहे. 206 कोटी रूपयांची महिला बालविकास विभागाने केलेली खरेदी हा केवळ घोटाळा नाही तर दरोडा आहे. गोरगरिब मुलांच्या तोंडी चिक्कीतून माती घालणा-या सरकारला जनाची नव्हे तर मनाचीही लाज राहिली नाही, असे सावंत म्हणाले.

या प्रकरणात भ्रष्टाचार झाला आहे या आपल्या भूमिकेवर काँग्रेस पक्ष ठाम आहे. काँग्रेस पक्षाकडे असलेल्या पुराव्यावर कोणासोबतही चर्चा करायला काँग्रेस पक्ष तयार आहे. या प्रकरणात लाचलुचपत विभागाने जी चौकशी केली त्याचे सर्व तपशील जाहीर करावेत. एसीबीची क्लीनचीट ही विभागाच्या मंत्र्यांसाठी भूषणावह नसून सरकारचे किती अधःपतन झाले आहे याचे प्रमाणपत्र आहे असे सावंत म्हणाले.