Breaking News

फितूर झालेल्या साक्षीदारांवर कारवाईसाठी जिल्हा न्यायालयात याचिका.

अहमदनगर : जामखेड तालुक्यात खर्डा येथील नितीन आगे या दलित युवकाच्या हत्येच्या प्रकरणी सुनावणी दरम्यान 13 साक्षीदार फितुर झाल्याने सर्वच्या सर्व 9 आरोपी न्यायालयात निर्दोष सुटले आहेत.या प्रकरणी मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागल्यानंतर अखेरीस सरकारी पक्षाने 13 फितूर साक्षीदारांवर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका जिल्हा न्यायालयात दाखल केली असून या संदर्भात 20 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. 



सदाशिव होडशीळ, विकास डाडर, रमेश काळे, रावसाहेब उर्फ अप्पा सुरवसे, लखन नन्नवरे, बबलू जोरे, विष्णु जोरे, सदाशिव डाडर, राजेंद्र गिते, अशोक नन्नवरे, हनुमंत मिसाळ, राजु जाधव अशी नितीन आगे खून प्रकरणी सुनावणीच्या वेळी फितुर झालेल्या साक्षीदारांची नावे आहेत. 28 एप्रिल 2014 रोजी प्रेमप्रकरणातून नितीन आगे याचा खून करण्यात आला होता.

त्यावेळी नितीन ला शाळेतून मारहाण करीत आरोपींनी बाहेर नेऊन अक्षरश: हालहाल करून त्याचा खून केला होता.मारहाणीच्या या घटनेला काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते.नितीन आगे खून प्रकरणी तपास करतांना पोलीसांनी वरीलपैकी 8 जणांचे जबाब दंडाधिकारी यांच्यासमक्ष नोंदविले होते. हे 8 साक्षीदार व अन्य 5 साक्षीदार फितुर झाल्याने नितीन आगे खून प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष सुटले आहेत.

सर्व आरोपी निर्दोष सुटल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रत दलित समाजातून मोठी टीका होऊ लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर सरकार पक्षाने फितुर आरोपींवर कायदेशीर कारवाई साठी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे.दरम्यान आगे खून प्रकरणाची फेरसुनावणी जिल्हा न्यायालयात करावी व सरकारच्या वतीने बाजू मांडण्यासाठी अ‍ॅड.उमेशचंद्र यादव यांचाी नियुक्ती करावी अशी मागणी दलित संघटनांकडून केली जात आहे.