Breaking News

कुख्यात गुंड चण्या बेगच्या टोळीतील एकास अटक

नाशिक, दि. 18, डिसेंबर - सिनेस्टाईल पाठलाग करत अहमदनगरमधील कुख्यात गुंड चण्या बेगच्या जवळच्या नातेवाईकाला नाशिकमध्ये पकडण्यात नाशिक शहर पोलिसांच्या इंदिरानगर शाखेला यश आले आहे. त्यातील एकजण फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे.


इंदिरानगर गुन्हे शाखेचे पोलीस पथक वासननगर ते माउलीनगर परिसरात पेट्रोलिंग करत होते. वासननगरच्या आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमजवळ एका काळ्या रंगाच्या दुचाकीवर जर्किंग परिधान केलेले दोन जण पोलिसांना दिसले. त्यांचा संशय आल्याने पोलीस त्यांच्याजवळ जाताच त्यांनी तिथून पळ काढला.
पथकातील पोलीस उपनिरीक्षक निरी रोहित शिंदे यांनी कर्मचार्‍यांसोबत त्यांचा पाठलाग केला. तेव्हा ज्या रस्त्याने ते पुढे पळाले तिथला रस्ता डेडएंड असल्यामुळे त्यांना पुढे पळता आले नाही. मात्र त्यांनी दुचाकी सोडून तिथून पाथर्डी रोडकडे पळ काढला.
त्यांच्या पाठीमागे पोलिसांचे गस्तीपथक होते. दोघांपैकी एकजण धावता धावता अचानक एकजन पडला आणि जखमी झाला. त्यामुळे त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले मात्र यावेळी त्याची पोलिसांशी झटापटदेखील झाली होती. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याचे नाव अंकुश रमेश जेधे (वय 24, श्रीरामपूर, जि नगर) असल्याचे समजले. तसेच झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा व त्यात मगझीनचे तीन राउंड आढळून आले.
त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने श्रीरामपूर पोलीस स्टेशनच्या मोक्का अंतर्गत कारवाईत गेल्या दोन वर्षांपासून फरार असून श्रीरामपूर येथील कुख्यात गुंड सागर बेग उर्फ चन्या बेग याचा नातेवाईक असल्याची कबुली दिली.त्याच्याकडून दुचाकी, गावठी कट्टा व राउंड असा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात कलम 353 आणि आर्म अक्ट 3/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याला पकडण्यासाठीही परिमंडळ 2 चे उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे व सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निरी रोहित शिंदे करीत आहेत.