Breaking News

विजेची तार कोसळल्याने बाजारपेठेत गोंधळ

सिंधुदुर्गनगरी, दि. 18, डिसेंबर - खारेपाटण आठवडा बाजारामध्ये अचानक विद्युत तार तुटून पडल्याने मोठा गोंधळ उडाला. विद्युत तार तुटून एकमेकांना चिटकल्याने विद्युत प्रवाह खंडित झाला त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.


खारेपाटण मच्छी मार्केट ते लिक्की दरम्यान 100 मीटरची असलेल्या रस्त्यालगत विद्युत तारा भर बाजारातून जातात. या तारेच्या खाली आठवडा बाजार भरत असतो. दुपारी 2 च्या सुमारास बाजारातील वर्दळ थोडीशी कमी झाली होती. याच दरम्यान अचानक माडाचे झावळ तारेवर पडून तार तुटली. लाईटच्या तारा एकमेकांना चिकटल्याने आगीच्या ठिणग्याखाली आल्या आणि पळापळ सुरू झाली. या तुटलेल्या तारेचा शॉक लागत असल्याची अफवा लोकांमध्ये पसरल्याने लोकांची पळापळ सुरू झाली. 

तसेच संपूर्ण बाजारात गोंधळ उडाला.काही माणसे या पळापळीत गटारात, तसेच रस्त्यावर पडली. व्यापार्‍यांच्या दुकानातील भाजी ,फळे,याची देखील या धावपळीत नुकसान झाले.जो-तो आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागले. लगेच येथील भाजी व्यापारी किशोर पिसे यांनी वीज परिवहन केंद्रात फोन करून विद्युत प्रवाह खंडित करण्यास सांगितला व घटनास्थळी वायरमनना बोलवून घेतले. सुदैवाने आठवड्या बाजारात पडलेली ही तार विद्युत प्रवाह खंडीत झाल्याने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. परंतु जर ही तार इतर तारांना स्पर्श न क रता लोकांच्या अंगावर पडली असती तर मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले असते.
खारेपाटण गावातील जीर्ण झालेल्या या तारा 40 वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यामुळे अशा या जीर्ण झालेल्या विद्युत तारा वेळीच बदलणे गरजेचे आहे. तसेच विद्युत तारावर असलेली झाडे तोडणेही आवश्यक आहे. असे ग्रामस्थाचे म्हणणे आहे.