Breaking News

बॅरेज परिसरातील प्रलंबित वीज जोडण्यांसाठी जलसंपदा विभागाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


पैनगंगा नदीवरील 11 बॅरेज उभारणीचे काम पूर्ण होऊन एक वर्षापेक्षा अधिक कालावधी पूर्ण झाला आहे. या बॅरेज परिसरातील कृषिपंपांना वीज जोडण्या देण्यासाठी आवश्यक असलेला 95कोटी रुपये निधी जलसंपदा विभागाने तातडीने महावितरणला उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. नागपूर येथे विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या वाशिम जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, खासदार संजय धोत्रे, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक,मुख्य सचिव सुमित मल्लिक, अप्पर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, बॅरेज परिसरातील वीज जोडण्यांसाठी महावितरणने 95 कोटी 80लक्ष रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार जलसंपदा विभागाने तत्काळ महावितरणला निधी उपलब्ध करून द्यावा. निधी प्राप्त होताच महावितरणने वीज जोडण्या देण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून द्यावी. कोणत्याही परिस्थितीत वीज जोडण्यांची कामे रखडता कामा नये. जिल्ह्यातील सर्व प्रलंबित वीज जोडण्या देण्याची कार्यवाही गतिमान करावी. 

त्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी महावितरणला दिल्या. जिल्ह्यात सौर कृषिपंपांना शेतकऱ्यांची मागणी आहे, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सौर कृषिपंप देण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. याकरिता केंद्र शासनाचे सहकार्य मिळविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. वाशिम शहराला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आराखडा तयार करावा.