Breaking News

दौंड तालुक्यात विना परवाना गावठी कट्ट्याचे रॅकेट, 2 आरोपींना अटक

पुणे, दि. 13, डिसेंबर - दौंड तालुक्यात पोलिसांनी आणखी 2 जणांना विना परवाना गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. केडगाव - वाखारी परिसरातून या आरोपींना यवत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापूर्वी विना परवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली होती. यामुळे दौंड तालुक्यात विना परवाना गावठी कट्टा पुरविणारे रॅकेट असल्याची माहिती पुढे येत आहे.

रविंद्र दुर्गा शिंदे ( वय 22 वर्ष रा. दापोडी, ता. दौंड, जि.पुणे) व सचिन नंदू पानखडे (वय 27 वर्ष रा.आखोनी, ता. कर्जत, जि.अहमदनगर) असे अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत.आतापर्यंत विना परवाना गावठी कट्टा (रिव्हॉल्व्हर) बाळगल्याप्रकरणी आरोपींकडून 3 गावठी कट्टे व 7 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या घटनेमुळे दौंड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

पोलीस नाईक गणेश पोटे यांना केडगाव-वाखारी रस्त्यावर 2 तरुणांकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाली होती. याप्रकरणाची खात्री करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक राहुल यादव, अविनाश राठोड, पोलीस नाईक गणेश पोटे, सचिन होळकर, मंगेश कदम यांचे पोलीस पथक शोध घेण्यास गेले. तेव्हा बाजार समितीकडे जाणार्‍या रस्त्यावर 2 तरुण गप्पा मारत उभे होते. त्यांच्याजवळ अचानक जाऊन पोलिसांनी अंगझडती घेतली असता 1 गावठी कट्टा व 2 काडतुसे मिळून आली आहेत.