Breaking News

युवराज कामटेच्या मामेसास-यास 14 दिवसांची पोलीस कोठडी

सांगली, दि. 13, डिसेंबर - अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्याकडील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे व त्याच्या सहकारी पोलिसांना मदत क रणा-या बाळासाहेब आप्पासाहेब कांबळे (वय 48, रा. सत्यविजय अपार्टमेंट, खणभाग, सांगली) याला मंगळवारी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. खापे यांनी 14 दिवसांची पोलीस कोठडी दिली. 

बाळासाहेब कांबळे हा युवराज कामटे याचा मामे सासरा आहे.सांगली शहर पोलिसांच्या अमानुष मारहाणीत अनिकेत कोथळे याचा मृत्यू झाला होता. मात्र पोलिसांनी अनिकेत कोथळे व त्याचा साथीदार अमोल भंडारे हे दोघे पळून गेल्याचा बनाव केला होता व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने अनिकेत कोथळे याचा मृतदेह कावळेसाद (आंबोली) येथे नेऊन जाळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी युवराज कामटे याच्यासह बडतर्फ पोलीस हवालदार अनिल लाड, अरूण टोणे, नसरूद्दीन मुल्ला, वाहनचालक राहूल शिंगटे व झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले अशा सहाजणांना राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केली आहे. सध्या हे सर्वजण कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

अनिकेत कोथळे याचा मृतदेह पोलीस ठाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी युवराज कामटे व त्याच्या साथीदारांना बाळासाहेब कांबळे याने मदत केल्याचे राज्य गुन्हा अन्वेषण विभागाच्या तपासात पुढे आले आहे. अनिकेत कोथळे याचा मृतदेह या सर्वांनी विश्रामबाग येथील एका खासगी रूग्णालयात नेला होता. राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने त्या रूग्णालयाबाहेरील सीसी टिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते.