Breaking News

दळणवळणापासून खेडी ‘कोसो’ दूर ,अनेक गावांत पोहोचलीच नाही एसटीची ‘लालपरी’


राहुरी प्रतिनिधी -राहुरी तालुक्याला बस आगाराची प्रतिक्षा गेल्या अनेक वर्षांपासून असल्याने तालुक्याच्या दळणळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. तालुक्याच्या अनेक गावात एसटीची लालपरी आजवर फिरकलीच नसल्याचे चित्र तालुका विकासाच्या दृष्टीने आजही अनुत्तरीत आहे.
राहुरीचे बसस्थानकशेजारील तालुक्यांच्या बस आगारावर अवलंबून आहे. श्रीरामपुर, नेवासा, नगर तालुक्याच्या आगारातील बस येथील स्थानकात सोडण्यात येतात. यानंतर राहुरी बसस्थानकातून तालुक्याच्या ग्रामीण भागात मोजक्याच हाताच्या बोटावर मोजता येतील, अशा बस राहुरी तालुक्याच्या गावातील रस्ते व वाड्यावस्त्यावर फेऱ्या मारताना दिसतात. त्याही ठराविक वेळेत. तसेच एखादी बस नादूरुस्त झाल्यास ३० ते ४० कि. मी. अंतर असलेल्या आगारातील बस उपलब्ध होत नाही. तोपर्यंत प्रवाशी ताटकळलेल्या स्थितीत अडकून पडतात. यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण व आर्थिक व्यवस्था सुधारणेच्या मार्गावर नसल्याने विकासापासून ग्रामीण परिसर ‘कोसो’ दूर आहे

नगर जिल्ह्यातील ९६ गावांचा मध्यवर्ती तालुका नगर मनमाड राज्यमार्ग,शिर्डी व शनिशिंगणापूर या आंतरराष्ट्रीय तिर्थस्थळांच्या मार्गावरिल मध्यवर्ती ठिकाण, १९६२ साली स्थापन झालेले दहाजिल्ह्यांचे कृषीकार्यक्षेत्र असलेले व कृषीपंढरी म्हणून जागतिक ओळख असलेले राज्यातील पहिले कृषीविद्यापीठ, दोन साखर कारखाने,जिल्ह्यातील दोन नगरपरिषदा असलेला एकमेव तालुका,सोलापूर रेल्वे विभागातील राहुरी रेल्वेस्टेशन,२६ हजार दलघफू क्षमतेचे दक्षिण जिल्ह्याचे जीवनदायीनी असलेले मुळाजलाशय,प्रति पंढरपुर ओळख असलेले संतकवी महीपती महाराज यांचे समाधीचे ठिकाण असलेले तिर्थक्षेत्र,कांद्याची देशात नावाजलेली बाजारसमिती अशा महत्त्वाचे ठिकाण व शैक्षणिक,सामाजिक, धार्मिक,आर्थिक,औद्योगिक अशी ओळख असलेला राहुरी हा तालुका राज्यनिर्मितीनंतरही बस आगारापासून वंचित आहे,

तालुक्यातील शहरातील नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक, शेतकरी, व सर्वच जनसामान्य बसेसच्या गैरसोयीमुळे वंचीत आहेत,बसेस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने खाजगी वाहतुक व्यवस्थेवर तालुक्याचे दळणवळण अवलंबून असल्याने खाजगी वाहतुक येथे मोठ्याप्रमाणात सुरु असते ही बाब जनसामान्यांच्या दृष्टीने असुरक्षिततेच्या गर्तेत ढकलणारी,खाजगी वाहतुकीने नाईलाजास्तव प्रवास करावा लागत असल्याने अनेकदा अपघाताचे प्रसंग ओढवून नागरिकांना शारीरिक व्याधींचा प्रसंगी मृत्यूला सामोरे जाण्याची वेळ आल्याचे प्रसंगही घडले आहेत,विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान व व्यावसिकांना आर्थिक नुकसानीचा सामना दळणवळणासाठी बस उपलब्ध होत नसल्याने करावा लागण्याची वेळ नित्याची.

राहुरीला बस आगारासाठी जागा उपलब्ध नाही, असे कारण अनेकदा समोर आले. मात्र आहे त्या ठिकाणी जागा उपलब्ध होत नाही. तोवर राज्य परिवहन महामंडळाने मिनी बस आगार व नादुरुस्त गाड्यांसाठी मँकेनिकल मोबाईल व्हँन उपलब्ध करुन दिली तरी काही अंशी सुरक्षित दळणवळणाचा प्रश्न सुटू शकतो. राहुरी तालुक्यात ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे एसटीचे घोषवाक्य तसेच सुरक्षित प्रवासासाठी खाजगी वाहतूक प्रवास टाळा, राज्य परिवहन महामंळाच्या एसटीने सुखकर प्रवास करा, हे प्रवाशांसाठी असलेले धोरण सुखदायी ठरेल. अन्यथा हा प्रश्न पुढील अनेक वर्ष रेंगाळलेल्या अवस्थेत पडून राहील.