Breaking News

कापूस बोंड अळीची कृषी विभागाकडून होणार पाहणी

कोपरगाव ता.प्रतिनिधी- यावर्षी पर्जन्यराजाची झालेली अवकृपा, नैसर्गिक आपत्ती, सदोष बियाणे आदी कारणांनी शेती व्यवसाय अडचणीत आला. या पार्श्वभूमीवर कृषी अधिकाऱ्यांनी तक्रारी दाखल करण्याचे आवाहन केल्यामुळे आता कृषी विभागाकडे शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील बाधित क्षेत्राची पाहणी करणार असल्याचे कोपरगाव तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी सांगितले.


 ‘लोकमंथन’ने यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला होता. अखेर या पाठपुराव्याला यश आले. निसर्गाचा लहरीपणा आणि विजेचा खेळखंडोबा त्यातच कृषी खात्याची डोळेझाक यामुळे तालुक्यातील शेतकरी संक्रमण काळातून वाटचाल करत आहे. यंदा उशिराने पावसाचे आगमण झाले. हंड्याने पाणी घालून कपाशीची रोपे जगवली. आता पिक पदरात आले तर त्यावर शेंदरी बोंडअळीची संक्रांत आल्यामुळे उत्पन्नात मोठी घट झाली.

संपूर्ण तालुक्यात शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भाव इतक्या प्रमाणात वाढला आहे की, उत्पादन निम्म्याने घटणार असून शेतकऱ्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. केवळ सदोष बियाणे पदरात पडल्याने नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. कृषी विभागाकडे तक्रार देणेसाठी सहा पानांचा तक्रार अर्ज दिल्यानंतर कृषी विभागाचे कर्मचारी कापूस क्षेत्राची पाहणी करणार आहेत.


 मात्र अजून पंचनामे करण्याचे शासनाचे आदेश नसल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मुसमाडे यांनी सांगितले. त्यामुळे कागदी घोडे नाचवून आणि क्षेत्र पाहणीत गाड्यांचा धुराडा उडवून शेतकऱ्यांच्या पदरात काय पडेल, खरा प्रश्न आहे. मागीलवर्षी सोयाबीनची अशीच पाहणी करण्यात आली. कृषी विभागाच्यातज्ञांनाही समस्येची उकल झाली नसल्याने त्यांच्या अध्ययनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.