Breaking News

युवराज कामटेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

सांगली, दि. 20, डिसेंबर - अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह त्याच्या सहा साथीदारांना मंगळवारी येथील न्यायालयाने पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. त्यावेळी न्यायालय परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.


लूटमार प्रकरणी सांगली शहर पोलिसांच्या कोठडीत असलेल्या अनिकेत कोथळे याला युवराज कामटे याच्यासह बडतर्फ पोलीस हवालदार अनिल लाड, अरूण टोणे, सूरज मुल्ला, राहूल शिंगटे व झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले या सहाजणांनी अमानुष मारहाण केली होती. त्यात तो जागीच ठार झाला होता. मात्र या सर्वांनी अनिकेत कोथळे व त्याचा साथीदार अमोल भंडारे हा पळून गेल्याचा बनाव केला होता व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अनिकेत कोथळे याचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला होता. 

या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरवून गेला होता.या सर्वांची न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी पुन्हा त्यांना येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून अनेक महत्त्वपूर्ण बाबींची माहिती मिळवायची असल्याने या सर्वांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करावी, अशी विनंती राज्य गुन्हा अन्वेषण विभागाच्यावतीने करण्यात आली. त्यानुसार न्यायालयाने पुन्हा या सर्वांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याचा आदेश दिला. त्यानंतर या सर्वांना मोठ्या पोलीस बंदोबस्तात कळंबा कारागृहाकडे पाठविण्यात आले.