चालू वर्षात जगभरात ६५ पत्रकार आणि माध्यम कर्मचारी ठार !
पॅरिस : चालू वर्षात जगभरात आतापर्यंत ६५ पत्रकार आणि माध्यम कर्मचारी ठार झाल्याची धक्कादायक माहिती रिपोर्टर्स विदाऊट बॉडर्सच्या अहवालातून समोर आली आहे. ठार झालेल्या माध्यम कर्मचाऱ्यांमध्ये ५० व्यावसायिक प्रतिनिधींचा समावेश आहे. तर यादवीग्रस्त सीरियात सर्वाधिक पत्रकार ठार झाल्याचे अहवालातील आकडेवारीवरून दिसून येत आहे.
पत्रकारांना निशाणा बनविण्यात आल्याची गत १४ वर्षांतील ही सर्वात कमी संख्या आहे. जगातील धोकादायक ठिकाणांवर जाण्याचे पत्रकारांचे प्रमाण कमी झाल्याने या संख्येत घट झाली असावी, असे रिपोर्टर्स विदाऊट बॉडर्स म्हणजेच रिपोर्टर्स सैन्स फ्रंटियर्सने (आरएसएफ) म्हटले आहे. गृहयुद्धामध्ये होरपळत असलेला सीरिया पत्रकार आणि माध्यम कर्मचाऱ्यांसाठी सर्वाधिक धोकादायक स्थान बनले आहे.
या ठिकाणी १२ प्रतिनिधी मारले गेले. यानंतर मेक्सिकोत ११ पत्रकारांची हत्या करण्यात आल्याचे आरएसएफने सांगितले. मेक्सिकोत मारले गेलेल्या पत्रकारांमध्ये जेव्हियर वाल्डेज यांचाही समावेश आहे. वाल्डेज मेक्सिकोत सुरू असलेल्या अमली पदार्थ टोळ्यांमधील रक्तरंजित हिंसाचाराची माहिती जगाला देत होते.आकडेवारीनुसार ६५ पैकी ३९ पत्रकारांची हत्या करण्यात आली आहे. तर अन्य पत्रकारांचा मृत्यू हा हवाई हल्ला किंवा आत्मघाती हल्ल्यात झाला आहे..