दखल - पंजाब, राजस्थानमध्ये भाजपला धक्का
देशात सर्वांत अगोदर लाल दिव्याचा त्याग त्यांनी केला. नवज्योत सिद्धूला भाजपकडं जाण्यापासून रोखलं. आपल्या बरोबर घेतलं. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कॅ. सिंग यांच्या हाती पंजाबची सर्व सूत्रं दिली. त्याचा चांगला परिणाम झाला. गेल्या दहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत हे राज्य काँगे्रसच्या ताब्यात आलं. आम आदमी पक्षाला तिथं चांगली कामगिरी करून दाखविता आली नाही. कॅ. सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँगे्रसचं सरकार आल्यापासून त्यांनी फारसा विवाद निर्माण होऊ दिलेला नाही. चांगला कारभार करंताना त्यांनी संघटन कौशल्य दाखवून दिलं. गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून यापूर्वी भाजपचे विनोद खन्ना निवडून जात होते. तिथल्या पोटनिवडणुकीत कॅ. सिंग यांनी काँग्रेसला विजय मिळवून दिला. पावणेदोन लाख मतांच्या फरकानं काँग्रेसला मिळालेल्या विजयाची देशपातळीवर दखल घेतली गेली. आताही पंजाबमधील महानगरपालिकांच्या निवडणुकीत त्यांनी विरोधी भाजप, अकाली दल आणि आपच्या उमेदवारांना चारीमुंड्या चित केलं आहे.
गुजरातमध्ये भाजपची चांगलीच दमछाक करणार्या काँगे्रसनं पंजाबातील पालिका निवडणुकांमध्ये भाजप-शिरोमणी अकाली दल यांच्या युतीला लोळवलं आहे. पंजाबमध्ये अमृतसर, जालंदर, पतियाळा या तीन महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल दोन दिवसांपूर्वी जाहीर झाला. गुजरात आणि हिमाचल प्रदेश राज्यांच्या निवडणुकांच्या निकालांकडं देशाचं लक्ष वेधलं गेल्यानं पंजाबच्या निवडणुकांची पाहिजे तेवढी दखल घेतली गेली नाही. पतियाळा महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिरोमणी अकाली दलाच्या हाती अक्षरशः भोपळा आला आहे. पतियाळा ही मोठी महानगरपालिका असताना भाजप-अकाली दलाचा एकही नगरसेवक निवडून येऊ नये, इतकी मानहानी या दोन पक्षांच्या वाट्याला आली. काँगे्रसनं एकहाती सत्ता मिळविली. अमृतसर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँगे्रसनं 69 जागा जिंकल्या आहेत.
भाजप- शिरोमणी अकाली दल यांना अवघ्या 12 जागांवर विजय मिळाला आहे. पतियाळा महानगरपालिका निवडणुकीत काँगे्रसनं सर्वच्या सर्व म्हणजे 58 जागांवर विजय मिळवला आहे. तिथं भाजप- शिरोमणी अकाली दल यांना खातंसुद्धा खोलता आलं नाही, तर जालंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँगे्रसनं 66 जागा जिंकल्या आहेत. तिथं भाजपला 8 जागांवर तर शिरोमणी अकाली दलाला 4 जागांवर विजय मिळाला आहे. महानगरपालिकांसहित 29 नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीचंही मतदान रविवारी झालं होतं. तीन महानगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसला 193 जागा मिळत असताना भाजप आणि शिरोमणी अकाली दलाच्या युतीला अवघ्या 24 जागा मिळत असतील, तर दहा महिन्यांपूर्वीच्या निवडणुकीच्या पराभवातून हे दोन्ही पक्ष अजूनही सावरलेले नाहीत, हे लक्षात येतं. भाजपचा शहरी भागात प्रभाव असतो, हे सत्यही काँगे्रसनं पंजाबमध्ये निकाली काढलं आहे. गुजरात व हिमाचल प्रदेशकडं लक्ष देताना पंजाबमधील निवडणुकीकडं भाजप व अकाली दलाचं दुर्लक्ष झालं, की काय असा प्रश्न उपस्थित होतो.
गुजरातच्या निवड़णुकीची जबाबदारी काँगे्रसनं राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत व महाराष्ट्राचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपविली होती. त्याचा चांगला फायदा झाला. गुजरातला लागूनच राजस्थान हे राज्य आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राजस्थाननं भाजपला चांगलीच साथ दिली होती. त्याअगोदरच्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता उलथवून वसुंधराराजे शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार सत्तारुढ झालं; परंतु हे सरकार सत्तेत आल्यापासून कोणत्या ना कोणत्या विवादात सापडत आहे. ललितकुमार मोदी यांच्याशी भागीदारीत व्यवसाय, ललितकुमारांच्या पत्नीची सरकारमध्ये उच्चपदी नियुक्ती, वसुंधराराजे यांची वेगवेगळ्या क्रिकेट सामन्यांना उपस्थिती, त्यांच्या खर्चाचा झालेला वाद यामुळं हे सरकार चांगल्या कामांऐवजी वेगवेगळ्या वादांनी चर्चेत आहे.
गेल्या वर्षी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वसुंधराराजे व त्यांचा मुलगा दुष्यंतकुमार यांच्या प्रभागातच भाजपचा पराभव झाला होता. काँग्रेसनं तिथं विजय मिळविला होता. गेल्या वर्षीच्या निवडणुकीत भलेही भाजपनं जास्त जागा मिळविल्या होत्या; परंतु काँगे्रसची कामगिरीही दखल घ्यावी अशी होती. आता तर काँग्रेसनं भाजपवर मात केली आहे. राजस्थानमधील लोकसभेच्या दोन जागांची, तसेच विधानसभेच्या एका जागेची निवडणूक लवकरच होणार आहे. याशिवाय पुढच्या वर्षी राजस्थान विधानसभेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्येही वारे बदलाची चाहुल तर लागली नाही ना, असा अर्थ पोटनिवडणुकीच्या निकालावरून काढला जाऊ शकतो. गुजरात विधानसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीनंतर काँगे्रसला मंगळवारी राजस्थानमधून आनंदाची बातमी मिळाली. राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोट निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या चारही जागांवर काँगे्रसचे उमेदवार विजयी झाले. त्याचबरोबर 27 पैकी 16 पंचायत समिती आणि सहा नगरपालिकांवर विजय मिळवला. सत्ताधारी भाजपला 10 पंचायत समिती आणि सात नगरपालिकातील जागा मिळवण्यात यश आलं.
जिल्हा परिषदांच्या चार जागांपैकी मागील निवडणुकीत एक जागा भाजपकडं होती. ती यंदा काँगे्रसच्या पारड्यात गेली. स्थानिक निवडणुकीतील 19 जिल्ह्यातील 27 पंचायत समित्या, 12 जिल्ह्यातील 14 नगरपालिका व चार जिल्हा परिषद जागांसाठी 17 डिसेंबर रोजी मतदान झालं होतं. त्यात सर्वांधिक जागा काँग्रेसला मिळाल्या. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांतील काँग्रेसची कामगिरी भाजपपेक्षा उजवी आहे. या निकालाबाबत बोलताना भाजपची उलटी गिनती सुरू झाल्याचं पोटनिवडणुकीच्या निकालानं दाखवून दिल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी सांगितलं. आगामी अलवर आणि अजेमर लोकसभा तसंच मांडलगड विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसचा विजय होईल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. भाजपच्या नेत्यांनी मात्र या निकालाबाबत फारसं भाष्य केलं नाही. विशेष म्हणजे वसुंधराराजे व दुष्यंतकुमार यांच्याच मतदारसंघात भाजपला पुन्हा एकदा फटका बसला आहे. स्थानिक निवडणुकीच्या निकालात मुख्यमंत्री वसुंधरा यांचा मुलगा आणि खासदार दुष्यंत सिंह यांचा गड असलेल्या बारा जिल्ह्यातील दोन वॉर्डमधील सत्ताधारी भाजपचा पराभव धक्कादायक असल्याचे मानलं जातं; परंतु भाजपचे प्रदेश प्रवक्ते आनंद शर्मा यांनी मात्र स्थानिक निवडणुकांचे निकाल पक्षासाठी चांगले आल्याचं म्हटलं. काँगे्रसच्या अनेक जागा भाजपनं हिसकावल्याचं त्यांनी म्हटलं आहे.