Breaking News

दखल - नये दौर, नये नेतृत्त्व


काँग्रेसच्या 132 वर्षांच्या इतिहासात राहुल गांधी यांच्याकडं पक्षाची धुरा आल्यानं गांधी-नेहरू परिवारातून पक्षाचे अध्यक्ष होणारे ते सहावे अध्यक्ष आहेत. ज्या परिवारानं अलाहाबादची स्वत: ची कोट्यवधी रुपयांची जागा त्या काळात पक्ष व देशासाठी दिली, ज्या परिवारानं संपत्ती देशासाठी त्यागली, ज्या परिवारानं देशाच्या स्वातंत्र्य युद्धात भाग घेतली, ज्या परिवारातील दोन सदस्यांनी देशाच्या अखंडता, एकात्मतेसाठी बलिदान दिलं, त्या परिवारावर घराणेशाहीची टीका करण्याअगोदर काँग्रेसचा इतिहास समजावून घेतला पाहिजे. 132 वर्षांत नेहरू-गांधी परिवारातील फक्त सहा सदस्य पक्षाचे अध्यक्ष झाले. सर्वांधिक काळ या परिवाराकडं पक्षाचं नेतृत्त्व असलं, तरी पक्षाला अडचणीतून बाहेर काढण्याचं कामही याच कुटुंबानं केलं. काँग्रेसची स्थापनाच परदेशी व्यक्तीनं केली असल्याचा इतिहास माहित नसणार्‍यांनीच सोनिया गांधी यांच्या अध्यक्षपदाला विरोध केला होता. 
पंतप्रधान होण्याची संधी असूनही सोनिया यांनी ती नाकारली. त्या पंतप्रधान झाल्या असत्या, तर सुषमा स्वराज यांच्यासह बर्‍याचजणींना केशवपन करून घ्यावं लागलं असतं; परंतु सोनियांनी त्यांचं काम सोपं केलं. राजीव गांधी यांच्यावर गैरव्यवहाराचे अनेक आरोप झाले; परंतु आरोपकर्त्यांची सत्ता येऊनही त्यांना ते सिद्ध करता आले नाहीत. सोनियांनी 19 वर्षे पक्षाचं नेतृत्त्व केलं. आता त्यांनी निवृत्ती पत्करली आहे. त्यांच्याच काळात पक्षाची कधी नव्हे, एवढी अधोगती झाली आहे. भाजपनं काँग्रेसपुढं अस्तित्त्त्वाचा प्रश्‍न उभा केला आहे. अशा पार्श्‍वभूमीवर राहुल यांच्या हाती काँगे्रसची धुरा आली आहे. राहुल तरुण असले, तरी काँग्रेसला राजीव गांधी हे त्यांच्यापेक्षा तरुण अध्यक्ष लाभले होते. काँगे्रसमध्ये आता राहुलपर्व सुरू झालं आहे. 


राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांच्याकडून पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली. राहुल यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा काँगे्रेसनं सोमवारी केली होती. शनिवारी त्यांचा पक्षाभिषेक सोहळा पार पडला. या कार्यक्रमात काँग्रेसच्या अध्यक्ष या नात्यानं त्यांनी त्यांचं शेवटचं भाषण केलं. हे भाषण करताना त्या अतिशय भावुक झाल्या होत्या. सध्याचं वातावरण आणि राहुल यांच्यापुढील आव्हानांची त्यांनी जाणीव आहे. त्यामुळं तर त्यांनी संवैधानिक मूल्यांवर होत असलेल्या हल्ल्याचा उल्लेख करून देशात भीतीचं वातावरण निर्माण करण्यात आलं असल्याचं निदर्शनास आणलं. देशाच्या मूल्यांचं रक्षण करणं हेच ध्येय असल्याची जाणीव त्यांनी कार्यकर्त्यांना करून दिली. 2014 पासून आपण विरोधी पक्षात असलो, तरी आपण घाबरणारे आणि झुकणारे नाहीत, असं त्यांनी नमूद केलं. राहुलविषयी फार बोलण्याचं त्यांनी टाळलं असलं, तरी त्याला लहानपणापासूनच कराव्या लागलेल्या हिंसेचा आणि राजकारणात आल्यानंतरही त्याच्यावर होत असलेल्या हल्ल्याचा उल्लेख करून त्यातून तो निडर आणि मानसिकदृष्टया आणखी कणखर झाल्याचे कौतुकोद्गार त्यांनी काढले. 

इंदिरा गांधी आणि त्यांच्या पाठोपाठ राजीव गांधी यांची देखील हत्या झाली. सोनिया यांनी हे सर्व जवळून पाहिलं. अनुभवलं. त्यामुळं राजकारणात येण्याची त्यांची इच्छा नव्हती. तरीही त्यांना राजकारणात यावं लागलं, हा इतिहासही समजावून घेतला पाहिजे. आता काँग्रेसची नव्या पिढीकडं आली आहे. राहुल यांचं वय सध्या तरुणाईत बसण्यासारखं नसलं, तरी अन्य नेत्यांच्या तुलनेत ते तरुण आहेत. सध्या आपला देश तरुण आहे. जख्खडांचा पक्ष म्हणून ज्या काँग्रेसचा उल्लेख होत होता, त्याचं नेतृत्त्व आता तरुणाकडं आलं आहे. देशातील तरुणांच्या आशा, अपेक्षा समजावून घेऊन त्यांना पक्षाशी जोडण्याचं मोठं आव्हान त्यांच्यापुढं आहे. राहुल त्यादृष्टीनं वाटचाल करताना दिसत आहेत. काँग्रेस तरुणांना काय कार्यक्रम देणार, संघटनेची नव्यानं बांधणी कशी करणार, भाजपचं आव्हान पेलण्यासाठी पक्षातील कोणत्या चेहर्‍यांकडं जबाबदारी सोपविणार, जबाबदारी राजकारणातून बाहेर पडणार का, अशा प्रश्‍नांची उत्तरं त्यांना आगामी काळात द्यावी लागतील. 

भाजप हाच काँग्रेसचा मुख्य स्पर्धक आहे. त्याचं आव्हान पेलून त्याला पराभूत करायचं असेल, तर समविचारी पक्षांना बरोबर घ्यावं लागेल. वयस्कांचा सन्मान ठेवून तरुणांच्या हाती सूत्रं द्यावी लागतील. भाजपला कुरघोडी करू द्यायची नसेल, तर त्याच्याविरोधात आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरच्या पहिल्याच भाषणात त्यांनी त्याची चुणूक दाखविली. गुजरातच्या निवडणुकीपासून सौम्य हिंदुत्त्वाचा पुरस्कार काँग्रेसनं सुरू केला असला, तरी ते करताना काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनांना सुरुंग लागणार नाही आणि पारंपारिक मतपेढ्या पुन्हा काँगेे्रसकडं कशा येतील, यावर त्यांना भर द्यावा लागणार आहे. भाजपचे लोक संपूर्ण देशात आग आणि हिंसा पसरवत आहेत. भाजप देश तोडण्याचा प्रयत्न करत असून काँगˆेस सर्वांना जोडण्याचा प्रयत्न करत आहे, हे त्यांचं वक्तव्य पक्षाची पुढची दिशा काय असेल, हे अधोरेखित करतं. भाजपला टक्कर द्यायची असेल तर, बॅकफूटवर न राहता आक्रमक व्हावं लागेल, हे अचूक ओळखून, काँगˆेस अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर केलेल्या पहिल्या भाषणात राहुल गांधी यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला आहे. 

13 वर्षांपूर्वी मी राजकारणात आलो, तेव्हाचं चित्र वेगळं होतं. राजकारणाचा वापर करून जनतेची सेवा करण्याऐवजी आज लोकांना चिरडलं जातंय. भाजप देशात आग लावण्याचं काम करतोय. त्यांना रोखण्याचं - आग शांत करण्याचं काम कुणी करत असेल तर ते काँग्रेसचे प्रेमळ कार्यकर्ते आणि नेते करीत आहेत. ते आवाज दाबतात, तर आम्ही संवाद साधतो, ते द्वेष करतात आणि आम्ही प्रेेम करतो, ते तोडतात, आम्ही जोडतो हाच आमच्यातला फरक आहे, अशी चपराक त्यांनी लगावली. भाजपनं कितीही हल्ले केले, तरी आम्ही मागं हटणार नाही. हार मानणार नाही, असं ठणकावून सांगताना पराभूत मानसिकतेऐवजी लढाऊ मानसिकतेचा प्रत्यय त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. आम्ही भाजपच्या नेत्यांना भाऊ-बहीण मानतो; पण ते आम्हाला संपवण्याची भाषा करतात. आम्ही त्यांच्या या द्वेषाचा सामना प्रेमानं करतो. 

आम्हाला भाजपची विचारधारा मान्य नाही; पण म्हणून आम्ही त्यांचा द्वेष करत नाही. रागाचं, तिरस्काराचं राजकारण हद्दपार करण्यासाठी मी तरुणांना काँग्रेसमध्ये येण्याचं आवाहन करतो, हे त्यांचं अपील त्यांच्या नव्या पावित्र्याची चुणूक आहे. सध्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचं वारं असताना राहुल यांच्याकडं पक्षाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळं त्यांच्या नेतृत्वाचा खरा कस लागणार आहे. एकीकडं पक्षाची नव्यानं मोट बांधतानाच देशावरील ढिली होत चाललेली काँगे्रसची पकड पुन्हा मजबूत करण्याचं महाकठीण आव्हानही त्यांच्यापुढं असणार आहे. एकवेळ देशातील बहुतांश राज्यांवर काँगे्रसचं वर्चस्व होतं; मात्र मोदीलाटेत एकेक राज्य गमावत चाललेल्या काँग्रेसकडं आता केवळ 5 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश पदुचेरीची सत्ता आहे. या अपयशाच्या गर्तेतून राहुल पक्षाला बाहेर काढतील का, या प्रश्‍नाचे उत्तर येणारा काळच देणार आहे.