Breaking News

महाराष्ट्र केसरी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात

पुणे, दि. 16, डिसेंबर - पुणे - मुळशी तालुक्यातील भूगाव येथे होणार्‍या 61 व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कुस्तीप्रेमींना 19 ते 24 डिसेंबर पर्यंत हा कुस्तीचा थरार अनुभवता येणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच मामासाहेब मोहोळ यांच्या गावी भूगाव येथे ही स्पर्धा होणार आहे.


स्पर्धेसाठी गादी व मातीचे आखाडे तयार करण्यात आले असून 50 बाय 50 आकाराचे गादीचे 2 आणि मातीचे 2 असे आखाडे केले आहेत. तसेच तब्बल 40 हजार लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रेक्षकांप्रमाणेच स्पर्धकांना देखील स्पर्धा पाहता यावी यासाठी वेगळी गॅलरी तयार करण्यात आली आहे. याविषयी सांगताना आयोजक शिवाजी तांगडे यांनी सांगितले की, पैलवानांचे गाव समजल्या जाणार्‍या भूगावमध्ये प्रथमच महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहे. 

स्पर्धेसाठी ग्रामस्थांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. स्पर्धक, प्रेक्षक आणि अधिकार्‍यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी अतिशय चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेचे आयोजन भूगावचे समस्त ग्रामस्थ, मल्लसम्राट प्रतिष्ठान भूगाव आणि मुळशी तालुका कुस्तीगीर संघ यांच्या वतीने करण्यात आले आहे.