Breaking News

शिंगणापूरजवळील पूल आणि रस्त्याला लागली ‘साडेसाती’ दिरंगाई ठेकेदाराची की बांधकाम विभागाची, नागरिकांचा सवाल

तालुक्यातील शिंगणापुर ते पढेगाव रस्त्याचे केंद्रीय महामार्ग निधीतून काही महिन्यांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले. मात्र रस्त्यावरील पुलांचे काम बाकी असतानाच रस्त्यावरील डांबर उखडून खड्डे पडण्यास सुरुवात झाली. शिंगणापूर गावातील नदीकाठच्या रस्त्याला खड्डे बुजविण्यासाठी डांबराची अजून प्रतिक्षा असून रस्त्याच्या कामासाठी टाकलेले खडीचे ढीग विद्यार्थ्यांच्या मुळावर उठले असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तरीदेखील या रस्त्याची ‘साडेसाती’ मात्र संपता संपेना. या कामात ठेकेदाराकडून दिरंगाई होते, की बांधकाम विभागाकडून, असा सवाल उपस्थित होत आहे.

केंद्रीय मार्ग निधीतून डिसेंबर २०१४ मध्ये शिंगणापूर ते पढेगाव या साडेपाच किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी आणि त्यावरील दोन पुलांना ५. २१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. बरेच दिवस काम रखडले गेले. आमदारांच्या आढावा बैठकीत या कामाबद्दल अनेक प्रश्न बांधकाम विभागासमोर उपस्थित झाले. त्यामुळे कसेबसे मागील वर्षी रस्त्याच्या कामाला सुरुवात करुन घाईगडबडीत उरकण्यात आले. संपूर्ण कामात अंदाजपत्रकाप्रमाणे काम झाले नसल्याने कामाचा दर्जा राखण्यात आला नाही. नागरिकांचा आरोप आहे. त्यातील शिंगणापुर गावातील नदीकाठच्या रस्त्याला खड्डे बुजविण्यासाठी डांबराची अजूनही प्रतिक्षा आहे. रस्त्यावरील पुलाचे कामे अजुन अर्धवटच आहे. तोच रस्त्याला खड्डे पडल्याने लोकांना तोंडात बोट घालण्याची वेळ आली. या पुलाजवळील रस्त्याच्या कामासाठी अनेक महिन्यांपासून रस्त्याच्या दोन्हीही बाजूने खडीचे ढीग टाकलेले आहे. नेमके याच ठिकाणी गाव दोन्ही बाजूने शाळा, गाव, प्रवेशद्वार, म्हसोबा मंदिर, महादेव मंदिर, स्मशानभूमी व उताराचा रस्ता व वळण असून सकाळ, संध्याकाळ उसवाहततूक करणारे ट्रॅक्टर, बैलगाड्या व अन्य वाहनांची मोठी वर्दळ व गर्दी असते. दोन्ही बाजूंनी खडीचे ढीग यातून पायी चालणाऱ्या विद्यार्थ्यांना कसरत करत चालावे लागत आहे. याठिकाणी मोठी दुर्घटना होण्यापूर्वी रस्त्याचे व पुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे.

… तर निवडणुकांवर बहिष्कार का नको?

कोपरगाव वैजापूरला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. दोन ठिकाणच्या जिल्हा परिषद सदस्यांची याच मार्गावरुन नित्याने ये-जा असते. उद्योगसमूह आणि पूर्व भागातील विद्यार्थ्यांना तालुक्यात शिक्षणासाठी जाण्याचा महत्वाचा मार्ग आहे. त्याचप्रमाणे रेल्वेस्टेशनलाही जोडणारा हाच महत्वाचा मार्ग आहे. मात्र तरीदेखील या शिंगणापूर ते पढेगाव या रस्त्याची अवकळा नाहीशी व्हायला तयार नाही. शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना या रस्त्याच्या समस्येकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत यापुढील सर्वच निवडणुकांवर बहिष्कार का घालण्यात येऊ नये, अशी संतप्त प्रतिक्रिया या रस्त्याचा वापर करत असलेल्या प्रत्येकाकडून व्यक्त होत आहे.