Breaking News

बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत देणार - कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर


मराठवाडा आणि विदर्भातील बोंडअळीग्रस्त कापूस शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बोंडअळीबरोबरच तुडतुड्याच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार, बियाणे विकणाऱ्या कंपन्या आणि विमा कंपन्याकडून मदत देण्यात येईल, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विधानसभेत सांगितले.
राज्यातील कृषी क्षेत्रातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने सदस्य डॉ.अनिल बोंडे, सुनिल प्रभू, राजेंद्र पाटणी, हर्षवर्धन जाधव आदींनी नियम २९३ अन्वये मांडलेल्या प्रस्तावास उत्तर देताना ते बोलत होते. चर्चेत जवळपास ३० सदस्यांनी आपली मते मांडत प्रश्न उपस्थित केले.

कृषिमंत्री श्री. फुंडकर म्हणाले की, राज्यातील जवळपास १२० तालुके बोंडअळीने बाधित झाले आहेत. एकूण ४० लाख हेक्टर पैकी ९ लाख ४० हेक्टर जमिनीवरील कापसावर बोंडअळीचा हल्ला झाला आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संकरीत बियाणे तयार करून त्याची विक्री करण्याबाबत केंद्राला पत्र लिहीले असल्याचे त्यांनी सांगितले. 

तसेच मुदत संपलेली आणि तणवाढीस मदत करणाऱी बियाणे विकल्याप्रकरणी औरंगाबाद येथील मन्सेन्टो आणि महिकोची गोदामे सील करून त्यांच्यावर न्यायालयात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर या कंपन्यांकडून शेतकऱ्यांना मदतही मिळवून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तुडतुडाग्रस्त तसेच रोवण्या करु न शकलेल्या धानउत्पादक शेतकऱ्यांनाही मदत उपलब्ध करुन देऊ, असे ते म्हणाले.


राज्यातील कृषी विद्यापीठे आणि विभाग अधिक कार्यक्षम करण्यासाठी कृषी विभागातील सर्व रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची कार्यवाही सुरु आहे. त्याचबरोबर कृषी विद्यापीठातील संशोधकांच्या जागाही भरण्यात येणार असल्याचे सांगत राज्यातील ५० बोगस कृषी महाविद्यालये बंद करण्याचा निर्णयही घेतल्याचे त्यांनी सांगितले.