Breaking News

चोरीच्या घटनांमुळे पोलिसांचा कारभार चव्हाट्यावर! वृद्ध महिलेच्या गळयातील गंठण लंपास.


संगमनेर शहर व उपनगर परिसरात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटना वाढत असताना पोलीस प्रशासन ‘ढिम्म’ होऊन मुक्या बैलासारखे बसले आहे, असेच म्हणावे लागेल. सध्या काही दिवसांचाच आढावा घेतला असता आठवडाभरात चार ते पाच मोठ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांचा तपास अजून पॊलिस सुरु आहे. दरम्यान, आज {दि.१४} सकाळी नऊच्या सुमारास झालेल्या घटनेत शहरातील मालदाड रोड येथील रहिवासी भागात दोन दुचाकीस्वार पल्सरवर आले आणि वृद्ध महिला शांताबाई शिवाजी सातपुते यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील साडे तीन तोळ्यांचे दागिने दागीने ओरबाडले. विशेष म्हणजे हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. 
याप्रकरणी श्रीकांत शिवाजी सातपुते यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निकम करीत आहेत. सदर चोरटे चोरी करून पसार होतानाचे छायाचित्र सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. यात दोन दुचाकीस्वार असून एकाच्या डोक्यात हेल्मेट तर दुसऱ्याच्या डोक्यात टोपी असे स्पष्ट दिसत आहेत. चोरीच्या याच शृंखलेमध्ये दोन दिवसांपूर्वी संगमनेर बसस्थानकावरून एक प्रवाशी साहेबराव महादू उदावंत यांच्या गळ्यातील सहा तोळ्यांची चैन बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा उचलत चोरट्याने लांबवली. 

तसेच मागील आठवड्यात याच परिसरातील एका बंद घराचे कुलूप तोडून तीन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार गेल्या महिनाभराच्या कालावधीत आत्तापर्यंत एकूण ४४ विनाक्रमांकाच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. प्रत्येक मंगलकार्यालयाबाहेर दोन पोलीस कर्मचारी तैनात ठेवलेले आहेत. त्याचबरोबर वाहतूक पोलिसही यासर्व घटनांकडे लक्ष ठेऊन आहेत. एवढं सगळं असतांनादेखील या चोरट्यांची दिवसाढवळ्या चोरी करण्याची हिम्मतच कशी होते, हा मोठा यक्षप्रश्न आहे. उठसूट कत्तलखाने आणि अवैध व्यवसायांवर कारवाई करून आपली पाठ थोपटून घेणाऱ्या पोलिसांचे हात अशा खऱ्या चोरांपर्यंत कधी पोहोचणार, असा संतप्त सवाल आता शहरातील नागरिक विचारत आहेत.