Breaking News

आंबेडकरी घराण्यासह रिपब्लिकन ऐक्य होण्यासाठी निकष ठरवा - रामदास आठवले

मुंबई, दि. 17, डिसेंबर - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लाडके पुतणे मुकुंदराव आंबेडकर यांचे लवकर निधन झाले. ते आणखी काही काळ जिवंत राहिले असते तर रिपब्लिकन पक्षाची अशी शकले पडली नसती. बेकीची गटबाजी दिसली नसती. रिपाइं ऐक्य आवश्यक आहे. मात्र न फुटणारे रिपब्लिकन ऐक्य होण्यासाठी त्याबाबतचे निकष ठरविले पा हिजेत. आंबेडकर कुटुंबासह सर्व समाजाच्या एकजुटीसाठी रिपब्लिकन ऐक्य घडविले पाहिजे तीच खरी दिवंगत अशोकराव आंबेडकर यांना आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. 

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अंधेरीतील गोयंका हॉल येथे दिवंगत अशोक आंबेडकर यांच्या आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. दिवंगत अशोकराव आंबेडकर हे शांत आ णि विशाल मनाचे व्यक्तित्व होते. ते माणसातील माणूस होते. त्यांचा लोकसंग्रह मोठा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून त्यांच्यामुळे मुकुंदराव आंबेडकरांची समाजाला नेहमी आठवण होत होती. भारत बौद्धमय करण्याचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने आपल्याला वाटचाल करायची आहे. 

भारतीय बौद्ध महासभेचे दोन भाग पडलेत. आंबेडकर कुटुंब आणि समाज एकत्र येऊन एकच भारतीय बौद्ध महासभा स्थापन झाली तर त्याचे स्वागत होईल .भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि रिपब्लिकन पक्ष या तिन्ही संघटना देशभर वाढविणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार करूया, असे आवाहन करून आठवले यांनी दिवंगत अशोक आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.