Breaking News

छत्रपती शिवरायांचे व्यवस्थापन समजून घ्या : देशपांडे


कोपरगाव ता. प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ढाल आणि तलवारीच्या लढाया कालबाह्य झाल्या आहेत. जगात क्षेपणास्त्रांच्या आणि रिमोटच्या लढाया होत आहेत. शिवाजी महाराजांच्या काळातील ढाल तलवारी कालबाह्य झाल्या तरी छत्रपती शिवाजी महाराजांची ‘मॅनेजमेंट’ मात्र कालबाह्य झालेली नाही. ती युवकांनी समजून घ्यावी, असे प्रतिपादन व्याख्याते अनिल देशपांडे यांनी केले.
सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे आणि सदगुरू गंगागीर महाराज सायन्स्, गौतम आर्टस् अॅण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बहिःशाल शिक्षण मंडळाच्या डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘छत्रपती राजा शिवाजी मॅनेजमेंट’ या विषयावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. के. पी. काकडे होते. अध्यक्षीय भाषणात काकडे म्हणाले, की रयतेचे राज्य स्थापन करणारे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेत राष्ट्राचे हित पाहिले. जगापुढे व्यवस्थापनाचा आदर्श स्थापित केला. प्रा. प्रकाश सावंत यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास बहिःशाल शिक्षण मंडळाचे केंद्र कार्यवाह प्राध्यापक आर. एस. झरेकर, डॉ. संजय सांगळे, प्रा. गणेश विधाटे, डॉ. दाणे आदी उपस्थित होते. प्रारंभी प्रा. शिवाजी होन यांनी प्रास्तविक केले. प्रा. राजाराम कानडे यांनी आभार मानले.