आधिवेशनाची सुरूवात खडाजंगीने
नागपूर/प्रतिनिधी : विरोधकांची तीव्र घोषणाबाजी आणि आक्रमक सत्ताधार्यांचे प्रत्युत्तर अशा खडाजंगीत सोमवारी राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा श्रीगणेशा झाला. विधानसभेत ‘वंदे मातरम’झाल्यावर आक्रमक विरधाकांनी पहिल्याच दिवशी शेतकर्यांच्या विषयावर स्थगन प्रस्तावाची मागणी केली. परंतु, अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पहिला दिवस दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली देण्यासाठी असल्याचे सांगून हा स्थगन प्रस्ताव नाकारला. त्यामुळे संतप्त विरोधकांची घोषणाबाजी आणि सत्ताधार्यांचे तेवढेच आक्रमक प्रत्युत्तर अशा खडाजंगीने विधानसभेच्या कामकाजाला प्रारंभ झाला.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात तसेच विधानभवनाच्या बाहेर विरोधकांचा गदारोळ पाहायला मिळाला. शेतकरी कर्जमाफी, बोंडअळी, हमीभाव यांसारख्या मुद्यावर विरोधक आक्रमक झाले आहेत. विधानभवनाचे कामकाज सुरू होण्याच्या आधी विधीमंडळाच्या पायर्यांवर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर अधिवेशनाचे कामकाज सुरू झाल्यावर विरोधी पक्षाच्या आमदारांनी वेलमध्ये उतरून घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शेतकरी कर्जमाफी कर्जमाफीवर चर्चा घ्यावी व बोंडअळीने पिकाचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली.
त्यांच्या या मागणीनंतर विधानभवनात जोरदार गदारोळ सुरू झाला. विखे-पाटील यांनी आपल्या सोबत 100 रूपयांचा स्टॅम्प पेपर आणला होता. सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या योजनेमध्ये 41 लाख शेतकर्यांना कर्जमाफी मिळाली, हे मुख्यमंत्र्यांनी या स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावे, अशी मागणी विखे-पाटील यांनी केली. त्याचप्रमाणे बोंडअळीग्रस्त शेतकर्यांना एकरी 25 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी विधानसभेत गोंधळ घालणार्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांनीही सडेतोड उत्तर दिले. आघाडीच्या शासनकाळात पूर्ण विदर्भात जेवढी कर्जमाफी दिली तेवढी कर्जमाफी आम्ही एकट्या बुलढाणा जिल्ह्यात केली आहे.
आघाडीच्या शासनकाळात जर सिंचनाच्या योग्य सुविधा केल्या असत्या तर, शेतकर्यांवर ही वेळ आली नसती. तुमच्या नाकर्तेपणाची भरपाई आम्हाला करावी लागत असून विरोधक नक्राश्रु ढाळत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच ज्यावेळी या मुद्यावर चर्चा होईल त्यावेळी ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ करू असा इशाराही त्यांनी दिला. त्याचप्रमाणे राज्यातील 41 लाख शेतकर्यांना कर्जमाफी दिल्याचे एक हजार रुपयांच्या स्टँम्प पेपरवर लिहून देण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
विधान परिषद पहिल्याच दिवशी तहकूब
विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेच्या कामकाजालाही गोंधळाचे गालबोट लागले. शेतकर्यांच्या कर्जमाफीवर आक्रमक झालेल्या विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला होता. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उच्चारलेल्या ‘नौटंकी’ या शब्दावरून चांगलेच रणकंदन झाले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तब्बल 4 वेळा आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ होताच विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीवर चर्चेची मागणी केली. परंतु, सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी या चर्चेला अनुमती नाकारली.