सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना अटक व सुटका
नागपूर : राज्य सरकारच्या विरोधात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनआक्रोश हल्लाबोल पदयात्रेने नागपूर शहराच्या हद्दीत प्रवेश करताच खा. सुप्रिया सुळे, माजीमंत्री अनिल देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना पोलिसांनी अटक केली. नंतर या सर्वांची सुटका करण्यात आली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्य सरकारच्या विरोधात उद्या, मंगळवारी हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या 1 डिसेंबरपासून यवतमाळपासून हल्लाबोल पदयात्रा सुरू केली. पदयात्रेच्या 11 व्या दिवशी ही पदयात्रा नागपूर शहरात पोहोचली. या पदयात्रेचे नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे व माजी मंत्री अनिल देशमुख करीत होते. या पदयात्रेत जवळपास दीड हजारावर कार्यकर्ते होते व शांततेत ते नागपुरात येत होते. या पदयात्रेला नागपूर पोलिसांनी नागपूर विमानतळाजवळ अडवण्यात आले. पोलिसांनी दिंडीला अडविल्यामुळे सर्वजण रस्त्यावर बसले.
सुप्रिया सुळे व अनिल देशमुख पोलिसांशी चर्चा करीत होते. दिंडी शांततेने येत आहे. वाहतुकीला कोणताही त्रास होत नाही, हे सांगत असताना पोलिसांनी आडमुळी भूमिका घेऊन सुप्रिया सुळे व अनिल देशमुख यांना पोलिस व्हॅनमध्ये बसविले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘हल्लाबोल हल्लाबोल’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी या अटकेचा निषेध केला. खा. सुळे यांना अटक केल्यामुळे आतापर्यंत शांत राहिलेले कार्यकर्ते संतप्त झाले.
या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या वाहनांची हवा सोडली तसेच पोलिस व्हॅनच्या टपावर चढले. कार्यकर्ते संतप्त झाल्यानंतर काही वेळांनी पोलिसांनी खासदार सुळे व अनिल देशमुख यांची सुटका केली. कोणत्याही कायद्याचे उल्लंघन न करता पदयात्रा काढणार्या हल्लाबोल मोर्चातील कार्यकर्त्यांना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे व माजी मंत्री अनिल देशमुख यांना अटक केल्याचा राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी निषेध व्यक्त केला.