Breaking News

विकास कामात लोकप्रतिनिधींची भूमिका अत्यंत महत्त्वाची - उपसभापती माणिकराव ठाकरे


राज्यातील सर्व भागांचा समान विकास होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी नेहमी सतर्क राहावे लागते. विकास कामात लोकप्रतिनिधींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. विधिमंडळात उपलब्ध असलेल्या विविध आयुधांचा योग्य उपयोग करुन विकासात्मक कामे, आपल्या मतदार संघातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावा. असे प्रतिपादन विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या संसदीय अभ्यास वर्गात ‘लोकशाही राज्यातील लोकप्रतिनिधींची विकासात्मक भूमिका’ या विषयावर ते बोलत होते.श्री. ठाकरे म्हणाले, राज्यातील भौगोलिक परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे निर्माण होणारे प्रश्नही वेगवेगळे असतात. या सर्वांचा विचार करुन प्रश्न सोडविणे आणि विकासात्मक काम करुन घेणे आवश्यक आहे. राज्याचा कुठलाही भाग विकासात मागे राहून असमानता निर्माण होणार नाही याची खबरदारी लोकप्रतिनिधींनी घ्यावी. 

विधिमंडळाने लोकप्रतिनिधींना आपले प्रश्न मांडून ते सोडविण्यासाठी तारांकित प्रश्न, लक्षवेधी, अतारांकित प्रश्न, अर्धा तास चर्चा व अशासकीय ठराव असे आयुध उपलब्ध करुन दिले आहेत. यांचा योग्य वापर करुन विकासात्मक कामे करण्यास व प्रश्न सोडवून घेण्यासाठी उपयोग करावा. विकासात्मक काम करुन घेण्यासाठी पहिल्यांदा आपले काम अर्थसंकल्पीय पुस्तिकेमध्ये समाविष्ट करुन घेणे आवश्यक असल्याने लोकप्रतिनिधींनी त्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.