Breaking News

शिवाजी महाराज रुग्णालयात ‘एनआयसीयु’साठी अत्याधुनिक व्हेटींलेटर येणार ?

ठाणे, दि. 19, डिसेंबर - कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात असलेल्या नवजात अतिदक्षता विभागासाठी पाच अत्याधुनिक व्हेटींलेटर घेण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. तसेच अतिदक्षता विभागासाठी देखील व्हेटींलेटर घेण्यात येणार आहे. 


त्यामुळे दोन्ही विभाग मिळून एकूण 20 व्हेटींलेटरच्या खरेदीचा प्रस्ताव बुधवारी होणार्‍या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय आणि कळवा रुग्णालय या दोन्ही रुग्णालयांमध्ये व्हेटींलेटरची अपुरी व्यवस्था होती. त्यामुळे महानगरपालिकेने याची दखल घेत कळवा रुग्णालयासाठी पाच नग व्हेटींलेटर घेण्याचा निर्णय घेतला आहे.

20 व्हेटींलेटरपैकी 5 नग व्हेटींलेटर हे बालरोग व नवजात अतिदक्षता विभागासाठी घेतले जाणार आहेत. यासाठी 3 कोटी 35 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. तर पाच वर्षांसाठी निगा देखभाल करण्याचा खर्च हा 1 कोटी 17 लाख 25 हजार एवढा असणार आहे. त्यानुसार एकूण 4 कोटी 52 लाख 25 हजारांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.