Breaking News

ठाणेकरांचे पारसिक चौपाटीचे स्वप्न जूनपर्यंत पूर्ण होणार !

ठाणे, दि. 19, डिसेंबर - ठाण्यातील पारसिक चौपाटी प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या जूनअखेरपर्यंत ठाणेकरांचे चौपाटीचे ऐतिहासिक स्वप्न पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत पर्यायी व्यवस्था करण्याबाबत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पावले उचलण्यास सुरूवात केली असून त्याबाबतही लवकरच ठोस निर्णय घेण्यात येणार आहे. आज सकाळपासून जवळपास 5 तास जयस्वाल यांनी विविध प्रकल्पांची, रस्त्यांची, पारसिक चौपाटी आणि स्थानक प रिसराची पाहणी केली.


महापालिका आयुक्तांनी घोडबंदर रोडपासून आपल्या पाहणी दौ-यास सुरूवात केली. पोखरण रोड नं. 3, टिकुजिनी वाडी, ग्लॅडी अल्वारीस मार्ग, गांधीनगर चौक, पोखरण रोड नं. 2 या रस्त्यांची पाहणी करून सदर काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी नगर अभियंता अनिल पाटील यांना दिले. त्याचवेळी त्यांनी गांधीनगर ते शिवाईनगर चौकपर्यंत सुरू असलेल्या सायकल ट्रॅकच्या कामाची पाहणी करून सदर सायकल ट्रॅकचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच व्होल्टास कंपनी येथील नाल्यावरील पूलाची रूंदी वाढविण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही दिल्या. जयस्वाल यांनी पोखरण रोड नं. 2 पासून घाणेकर नाट्यगृहपर्यंत जाणा-या रस्त्याच्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त करून या रस्त्यामध्ये येणारे प्रार्थना स्थळ स्थलातंरीत करण्याच्या सूचना दिल्या.