Breaking News

चेंबर्सचा प्रश्‍न सोडविण्यासाठी वकिल जाणार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला


अहमदनगर (प्रतिनिधी)- वकिलांचा प्रलंबीत असलेला चेंबर्सचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी वकिल संघाच्या वतीने शुक्रवार दि.15 डिसेंबर रोजी जिल्हा न्यायालयात बैठक बोलाविण्यात आली आहे. नवीन जिल्हा न्यायालयाच्या शेजारी असलेल्या जिल्हा रुग्णालयाची काही पडिक जमीन वकिलांच्या चेंबर्ससाठी मिळण्याकरीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला वकिलांचे शिष्टमंडळ जाण्या संदर्भात चर्चा होणार आहे. तसेच हा प्रश्‍न सोडविण्यास पाठपुरावा करण्याकरीता चेंबर कमिटीची स्थापना केली जाणार असल्याची माहिती वकिल संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.सुरेश ठोकळ व अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली.
नवीन झालेल्या जिल्हा न्यायालयाच्या प्रशस्त इमारतीत वकिलांच्या चेंबर्सची व्यवस्था नसल्याने, वकिलांचे चेंबर्स होण्यासाठी न्यायालया शेजारील जिल्हा रुग्णालयाच्या जागे पैकी 8 आर जमीन मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. बाररुम मध्ये पुरेशी जागा नसल्याने प्रकरण हाताळताना गुप्तता न राहता वकिलांना मोठी अडचण निर्माण होत असल्याचे वकिलांचे म्हणने आहे. तसेच प्रधान जिल्हा न्यायधीश प्रकाश माळी यांच्या पुढाकाराने जुन्या न्यायालयाच्या इमारतीत कुटुंब, कामगार, औद्योगिक, सहकार न्यायालय तसेच जिल्हा ग्राहक मंच एका छताखाली आनण्याच्या मागणी संदर्भात या बैठकित चर्चा केली जाणार आहे.

प्रधान जिल्हा न्यायधीश प्रकाश माळी यांनी अल्पकालावधीत बार व बेंचमध्ये समन्वय साधण्यात महत्त्वाची भुमिका बजावली आहे. मध्यंतरी न्यायालयात जो तणाव निर्माण झाला होता. तो पुर्णत: मावळला आहे. बार व बेंच एकमेकास पुर्ण सहकार्य करुन न्याय दान प्रक्रिया राबविण्यास महत्त्वाची भुमिका बजावत आहे. वकिलांच्या चेंबर्सचा प्रश्‍न मार्गी लागल्यास या न्यायदान प्रक्रियेला अजून गती मिळणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.