Breaking News

स्मिता पाटील यांच्या स्त्रीविषयक भूमिका आजही जिवंत- पंकजा मुंडे


व्यक्तिमत्व हे केवळ चेहऱ्यावरून ठरविता येत नाही. विचार, आचार, खरेपणा आणि ताकद हे व्यक्तिमत्वाचे महत्वाचे पैलू आहेत. दिवंगत स्मिता पाटील या अशाच व्यक्तिमत्वाच्या धनी होत्या. विविध चित्रपटातून त्यांनी केलेल्या स्त्रीविषयक भूमिका आजही जिवंत वाटतात, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
राष्ट्रभाषा संकुलातील बाबुराव धनवटे सभागृहात विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे आयोजित स्मिता स्मृती पुरस्कार प्रदान समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कवी कालिदास विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, आमदार सतेज पाटील, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता मेघे, कार्याध्यक्ष गिरीश गांधी, हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया, सुनील लिमये आदी उपस्थित होते.

स्मिता पाटील यांच्याजवळ आवाज आणि आकर्षक व्यक्तिमत्व होते, असे सांगून श्रीमती मुंडे म्हणाल्या, त्यांनी 1980 च्या दशकात अतिशय दर्जेदार चित्रपट केले. त्यांनी विविध चित्रपटातून सामाजिक भूमिका साकारून समाजाला एक संदेश दिला. स्त्रियांचे प्रत्येक पैलू त्यांनी आपल्या अभिनयातून मांडले. “जैत रे जैत”, “उंबरठा”, “मिर्च मसाला” अशा अनेक चित्रपटात त्यांनी अविस्मरणीय भूमिका केल्या. आजही त्या जीवंत असत्या तर शेतकरी व महिला या विषयांवर त्यांनी भूमिका केल्या असत्या.

अध्यक्षीय भाषणात डॉ. चांदे म्हणाले, स्मिता पाटील यांना केवळ 31 वर्षांचे आयुष्य मिळाले. एवढ्या कमी कालावधीत त्यांनी उत्कृष्ट अभिनय साकारला. त्यामुळेच त्यांची ख्याती राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे.