Breaking News

रिसॉर्टची बदनामी टाळण्यासाठी पोलिसांच्या मदतीने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

ठाणे, दि. 19, डिसेंबर - शांग्रीला रिसॉर्टमधील महिलेच्या छेडछाडीची चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर रिसॉर्टची बदनामी नको म्हणून व्यवस्थापकाने पोलिसांच्या मदतीने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असे सांगण्यात येत आहे. मुंबई-नाशिक मार्गावर असलेल्या शांग्रीला रिसॉर्टमध्ये काल एका तरुणाने महिलेची छेड काढली. यानंतर महिलेने संबंधित घटनेची तक्रार व्यवस्थापकाकडे केली मात्र व्यवस्थापकाने याकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून आले. 


छेड काढणा-या तरुणाला महिलेसोबत असलेल्या तरुणांनी बेदम मारहाण केली. याकारणावरुन पुढे दोन गटांमध्ये जबरदस्त मारामारी झाली. यावेळी या पीडित महिलेने शांग्रीला रिसॉर्टच्या व्यवस्थापकाकडे छेडछाड करणार्‍या तरुणावर कारवाईची मागणी करत गोंधळ घातला.मात्र, व्यवस्थापकाने हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे.