Breaking News

भाजपच्या पाठिंब्याने परिवर्तन झाले हे विसरू नका : चित्ते


श्रीरामपूर प्रतिनिधी - लोकांना परिवर्तन हेवे होते. श्रीरामपूर नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने परिवर्तन झाले आहे. ज्यांचे वीस दिवस आधी मतदारयादीत नाव नव्हते, अशांना आम्ही निवडून दिले. मात्र तुमचे वरून ‘किर्तन’ आतून ‘तमाशा’ चालू द्या. परंतु भाजपच्या पाठिंब्याने परिवर्तन झाले हे विसरू नका, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रकाश चित्ते यांनी केले.

चित्ते हे मागील तीन दिवसांपासून शिवाजी रस्त्यालगत असणाऱ्या बेकायदेशीर इमारतीवर कारवाई करावी, या मागणीसाठी गांधी चौकात आमरण उपोषण सुरु केले होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे, तहसीलदार सुभाष दळवी, मुख्याधिकारी सुमंत मोरे आदींच्या हस्ते हे उपोषण सोडवण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यासंदर्भात मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी सांगितले, की बेकायदेशीर इमारतीसंदर्भात खुलासा मागविण्यात आला आहे. हा खुलासा प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे. यावेळी तालुकाध्यक्ष सुनील वाणी, शहराध्यक्ष व नगरसेवक किरण लुणिया, नगरसेवक दीपक चव्हाण, रवी पाटील, वैशाली चव्हाण, राजेंद्र चव्हाण, संजय यादव, सतीश सौदागर आदींसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.