दखल - नीच राजकारण आणि भाजपचा जाहीरनामा
विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत आता जाहीरनामा काढला जातो, असं नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरणारे राजकीय पक्षही जाहीरनामा काढायला लागले आहेत. काही राजकीय पक्ष जाहीरनाम्याला वचननामा असं नाव देतात, तर काही प्रतित्रापत्रावर जाहीरनामे काढायला लागले आहेत. जाहीरनाम्यातून संबंधित राजकीय पक्षांची विचारधारा, त्याच्या विकासाच्या संकल्पना, निवडून आल्यानंतर त्या राजकीय पक्षाचे प्राधान्यक्रम, करावयाच्या कामाचे स्वरुप आदी बाबी लक्षात येतात.
जाहीरनाम्यातील किती कामांची पूर्तता झाली, हा वादाचा विषय असू शकतो. बर्याचदा मागच्याच जाहीरनाम्यातील कलमंही टाकली जातात. भाजपनं मागच्या लोकसभा निवडणुकीत काढलेल्या जाहीरनाम्यात शेतकर्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. प्रत्यक्षात ते पाळता न आल्यानं भाजपची कोंडी झाली आहे.
गुजरातमध्ये मागच्या तीन निवडणुकांतील जाहीरनाम्यांत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात भाजपला अपयश आलं आहे. त्यामुळं कदाचित भाजपला जाहीरनामा काढण्यात रस उरला नसावा. निवडणुकीत जाहीरनाम्याला अतिशय महत्त्त्व असलं, तरी भाजपच्या लेखी मात्र जाहीरनाम्याला दुय्यम स्थान असतं. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदानाला अवघे दोन दिवस राहिले असताना जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला होता. आता गुजरातच्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान अवघ्या काही तासांवर आले असतानाही भाजपनं जाहीरनामा काढलेला नाही.
आरोप-प्रत्यारोप आणि नीच राजकारणाचं भांडवल करण्याच्या प्रयत्नांत भाजपला लोकशाहीतील महत्त्वाच्या प्रक्रियेतून जावं असं वाटलं नाही. भाजप वरवर जरी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी प्रेम दाखवीत असला, तरी बाबासाहेबांची संसदीय लोकशाही या पक्षाला मान्य नाही. त्याची व्यूहनीती पाहता भाजपला अमेरिकेची अध्यक्षीय लोकशाही खुणावते आहे. त्यामुळं संसदीय परंपरा मोडीत काढण्याचा चंग या पक्षानं बांधलेला असून जाहीरनामा प्रकाशित न करणं हा त्याचाच एक भाग असला पाहिजे.
भाजपकडून व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध करण्यात येईल, असं सांगितलं जात होतं; पण अद्यापपयर्ंत तरी भाजपनं जाहीरनाम्यातून मतदारांना कुठलंही वचन दिलेलं नाही. भाजपच्या या कृतीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली नसती, तरच नवल. भाजप जाहीरनामा टाळत आहे, त्यावरुन ते गुजरातच्या जनतेचा किती अनादर करतात, ते दिसतं आहे, अशी टीप्पणी राहुल यांनी केली आहे. काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वापरलेल्या नीच शब्दावरुन गुजरातमध्ये सध्या जोरदार राजकारण सुरू आहे.
या नीच शब्दाच्या राजकारणात गुजरात भाजपला निवडणूक जाहीरनाम्याचा विसर पडला आहे. गुजरातमध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मतदानाला काही तास राहिले असताना भाजपनं अजूनही निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. त्यावरुन विरोधकांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. गुरुवारी दुपारी पहिल्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. भाजपचा कट्टर विरोधक हार्दिक पटेल यानंही टि्वट करून जाहीरनामा न काढण्याच्या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे.
भाजप सेक्स सीडी बनवण्यामध्ये व्यस्त आहे. त्यामुळं ते निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करायला विसरले, असं टि्वट हार्दिकनं केलं. भाजपची खिल्ली उडवताना त्यानं हसणारे चार इमोजीही टि्वट केले आहेत. याच मुद्यावरून राहुल गांधी यांनीही भाजपवर टीका केली. गुजरातमध्ये गेल्या 22 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. काँग्रेसनं मात्र आपला जाहीरनामा अगोदरच प्रसिद्ध केला आहे. जाहीरनाम्यावरच्या टीकेवरून लक्ष विचलीत करण्यासाठी मोदी यांनी अय्यर यांच्या टीकेचा वापर करून घेतला आहे. गुजराती अस्मितेला फुंकर घालून त्या माध्यमातून भाजपला मतदान करण्याचं भावनिक आवाहन करण्यावर मोदी यांनी भर दिला आहे.
दिल्लीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झालं. खरं तर काँग्रेसच्या काळात आंतरराष्ट्रीय स्मारक उभं करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नरसिंहराव यांच्या सरकारनं हा निर्णय घेतला होता. राव, एच. डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, दोन वेळा अटलबिहारी वाजपेयी व त्यानंतर दोनदा डॉ. मनमोहन सिंग यांची सरकारं आली; परंतु त्यांच्या काळात या स्मारकाचं काम पुढं रेटलं गेलं नाही. त्यांच्यावर टीका करण्याचा मोदी यांना जरूर अधिकार आहे. सरकारच्या कामगिरीवर टीका करताना वैयक्तिक टीका करण्याचं काहीच कारण नव्हतं; परंतु मोदी सातत्यानं नेहरू-गांधी कुटुंबावर व्यक्तिद्वेषातून टीका करीत आहेत. परदेशात जाताना मोदी हे केवळ एका पक्षाचे नेते नसतात, तर ते देशाचे नेते असतात.
पंतप्रधान हा एका पक्षाचा नसतो. भारतात जेव्हा परकीय नेते येतात, तेव्हा ते त्यांच्या देशातील अंतर्गत राजकारणावर टीका करीत नाहीत; परंतु मोदी यांनी जर्मनी, मंगोलिया आदी ठिकाणी संकेतभंग करून देशांतर्गत राजकारणची धुणी परकीय धोबीघाटावर धुतली. आताही त्यांनी दिल्लीतील कार्यक्रमात नेहरू-गांधी कुटुंबावर टीका केली. त्यामुळं मणिशंकर अय्यर यांनी त्यांना खडसावले. खालच्या पातळीवरचं राजकारण मोदी करतात, असं त्यांना म्हणायचं होतं; परंतु हिंदी भाषक नसल्यानं त्यांनी वापरलेल्या शब्दामुळं वाद निर्माण झाले. मोदी हे पंतप्रधान असल्यानं त्या पदाचा अवमान होईल, अशी कोणतीही टीका करू नका, सल्ला राहुल यांनी काँग्रेसजणांना दिला होता; परंतु अय्यर यांच्या टीकेनं त्यांचा सल्ला धुडकावला गेला.
आता राहुल यांनीच त्यांना मोदी यांची माफी मागायला लावली. त्यांचं पक्षातून निलंबन करण्यात आलं. असं असलं, तरी त्याचं भांडवल मोदी करीत असून जाहीरनाम्याच्या मुद्याला फाटा देत भलेही नीच जातीचा असलो, तरी कामं मोठी केली आहेत, असं सांगत निवडणुकीला वेगळ्या वळणावर नेत आहेत. भाजप आणि मोदी यांनी काँगेस पक्षावर टीका करताना नेहमीच असभ्य भाषेचा वापर केला आहे. काँगेसची संस्कृती आणि वारसा वेगळा आहे. मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधानांवर टीका करताना वापरलेल्या भाषेचं समर्थन होऊ शकत नाही, अशा शब्दांत राहुल यांनी भाजप व काँग्रेसच्या संस्कृतीतील फरक दाखवून दिला आहे. आंबेडकरांचं जे स्वप्न होतं, ते पूर्ण करण्यासाठी एका व्यक्तीनं सर्वांत मोठं योगदान दिलं ते म्हणजे जवाहरलाल नेहरू.
अशा कुटुंबाबद्दल तुम्ही इतक्या घाणेरडया गोष्टी बोलता आणि तेदेखील आंबेडकरांच्या आठवणीत बांधण्यात आलेल्या इमारतीच्या उद्घाटनाच्या वेळी. अशावेळी इतक्या घाणेरडया राजकारणाची काय गरज होती, हा अय्यर यांचा मुद्दा मात्र या एका वादग्रस्त वाक्यावरून दुर्लक्षित राहिला. काँगेसनं गुजरातच्या मुलासाठी नीच शब्दाचा वापर केला असल्याचं सांगत मोदी यांनी त्याचं ही भांडवल केलं; परंतु त्याचवेळी गुजरातमधला एक उमेदवार दाढीवाले व टोपीवाल्यामुळं लोकसंख्या वाढत असल्याचं वक्तव्य करतो, त्याबद्दल मोदी काहीच बोलत नाहीत.
