Breaking News

लग्नानंतरही महिलेचा धर्म बदलणार नाही सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा

नवी दिल्ली : एखाद्या महिलेने दुसर्‍या धर्मातील पुरुषाशी लग्न केले, तर तिचा धर्म बदलणार नाही. अशाप्रकारचा कोणताही कायदा भारतात नाही, असा महत्वपूर्ण निर्वाळा शुक्रवारी  सर्वोच्च न्यायालयाने दिला. लग्नानंतर पत्नीच्या धर्मांतराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.


एका पारशी महिलेच्या प्रकरणात सुनावणी करताना सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तीच्या घटनापीठाने हा निकाल दिला आहे. या घटनापीठात दीपक मिश्रा यांच्यासह न्यायमूर्ती ए के सीकरी, एएम खानविलकर, डीवाय चंद्रचूड आणि अशोक भूषण यांचा समावेश आहे. गुलरुख एम. गुप्ता नावाच्या महिलेने एका हिंदू पुरुषाशी लग्न केलं. 

तिला तिच्या आई-वडिलांच्या अंत्यसंस्कारांना हजर राहायचं होतं. परंतु वलसाड पारसी बोर्डाने यासाठी परवानगी नाकारली होती. या प्रकरणाची पहिली सुनावणी 2010 मध्ये गुजरात हायकोर्टात झाली होती. पारशी महिलेने दुसर्‍या धर्मातील पुरुषाशी लग्न केलं तर पतीचा धर्मच तिचा धर्म असेल, असा निर्णय गुजरात उच्च न्यायालयाने दिला होता. 

त्यामुळे पारशी महिला अंत्यसंस्कारासाठी पारशींच्या ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ मध्ये जाण्याचा अधिकार गमावला होता. मात्र एखाद्या पारशी पुरुषाने दुसर्‍या धर्मातील महिलेशी लग्न केलं, तरी त्याचा धर्म कायम राहतो. मग पारशी महिलेसोबत वेगळा न्याय का असा प्रश्‍न महिलेने उपस्थित केला.

असा कायदा अस्तित्वात नाही...
महिलेने दुसर्‍या धर्मातील पुरुषासोबत लग्न केल्यास तिचा धर्म बदलेल, असा कोणताही कायदा  आजमितीस तरी आपल्याकडे नाही. आपल्याकडे स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट आहे.  दोन वेगवेगळ्या धर्माचे व्यक्ती लग्नानंतरही आपापली धार्मिक ओळख कायम ठेवू शकतात, असे देखील खंडपीठाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 डिसेंबरला होणार आहे. या दिवशी वलसाड बोर्ड ट्रस्टची बाजूही ऐकली जाईल. 9 ऑक्टोबरलाच हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्यात आले होते.