नाना पटोले यांचा खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपर्द
नवी दिल्ली/प्रतिनिधी : नाना पटोले यांनी शुक्रवारी लोकसभेच्या खासदारांचा राजीनामा सादर केल्यानंतर नाना पटोले यांनी पत्रकारपरिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली. भाजपचे भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी शुक्रवारी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची भेट घेऊन त्यांनी आपला राजीनामा सुपर्द केला.
जर हे सरकार ऐकत नसेल तर पुन्हा जनतेत जाऊन त्यांचे काम करणे महत्त्वाचे आहे’, असे नाना पटोले म्हणाले आहेत. ’चुकीच्या निर्णयांचं समर्थन करणार नाही, सरकारने माझा, जनतेचा विश्वासघात केला आहे. मी जनतेच्या आशीवार्दाने खासदार झालो आहे. कुण्या नेत्याच्या उपकाराने खासदार झालो नाही’, असा टोला नाना पटोले यांनी शुक्रवारी लगावला.
नाना पटोले हे गेल्या काही दिवसांपासून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत होते. स्वपक्षाच्या धोरणांवर त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली होती. शेतकरी प्रश्नावरुन त्यांनी अनेकवेळा सरकारविरोधी भूमिका घेतली होती. नुकतेच भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी अकोल्यात आंदोलन केले होते. त्या आंदोलनासाठी नाना पटोलेच यांनी सिन्हांना हाक दिली होती. राज्यात आणि देशात भाजपची सत्ता असूनही नाना पटोले यांनी थेट खासदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जनता माझ्या सोबतच आहे
नाना पटोले यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. पटोले यांनी 2009 मध्ये काँग्रेसमध्ये असताना कर्जमाफीच्या मुद्द्यावर स्वपक्षीयांवर हल्लाबोल करत आमदारकीचा राजीनामा दिला होता. ‘भाजपा सरकार आंधळं आणि बहिरं आहे. त्यामुळं सरकारच्या चुकीच्या भूमिकेविरोधात मी नेहमीच प्रश्न मांडतो. पक्षानं काय कारवाई करायची ती करु दे.’ असं म्हणत नाना पटोले यांनी वेळोवेळी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं.
सरकारकडून जनतेची फसवणूक
सरकारने जनतेला अनेक आश्वासने दिली, मात्र त्याची पूर्तता केली नाही, जनतेची फसवणूक केली. इतके दिवस मी बोलत होतो, त्यामुळे आता राजीनामा देत आहे, हे कोणत्या भाजप नेत्याला सांगण्याची गरज वाटली नाही’, असे ते म्हणाले. मी अजून कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नाही. मी पुढील राजकीय निर्णयाबाबत अजून विचार केलेला नाही. लोकांची इच्छा असेल तर ते मला पुन्हा लोकसभेत पाठवतील, पुन्हा निवडणूक झाली तर जनता माझ्याबरोबरच राहील’, असा विश्वास नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला.
पटोलेंना काँग्रेसची ऑफर!
नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला, मात्र पटोले यांना गेल्या महिन्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती.भाजपमध्ये राहून विरोध करण्यापेक्षा काँग्रेसमध्ये यावे, असे अशोक चव्हाण म्हणाले होते. 7 नोव्हेंबरला काँग्रेसने अमरावतीत विभागीय जनआक्रोश मेळावा घेतला होता. यावेळी चव्हाण यांनी पटोलेंना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर केली होती. मात्र आता राजीनामा दिल्यामुळे पटोले कोणत्या पक्षात प्रवेश करतात, हे काही दिवसांत स्पष्ट होईल.
मुख्यमंत्र्यांनी माझ्या वाटेला जाऊ नये
नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधत ‘मुख्यमंत्र्यांनी जे काही आम्हाला सहकार्य केलेलं असेल त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. राजकारणात कुणी कुणाच्या व्यक्तिगत जीवनात जायचे नसते. पण मुख्यमंत्र्यांची सध्याची जी सवय आहे की, जवळच्याच व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनात ते जातात. तसे माझ्या वाटेला त्यांनी जाऊ नये एवढीच माझी त्यांना सूचना आहे, असे नाना पटोले यावेळी म्हणाले.
