चौकशीत दोषी आढळल्यास अधिकारी-मालकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार- मुख्यमंत्री
लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंड परिसरातील मोजो आणि वन अबव्ह या उपाहारगृहांना (पब-रेस्टो) गुरुवारी मध्यरात्री आग लागून त्यात 14 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करून 15 दिवसांत अहवाल देण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत. शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या पाच अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. मात्र, घटनेतील मृत्यूप्रकरणी अधिकारी किंवा संबंधित मालक जबाबदार असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर फौजदारी व इतर गुन्हे दाखल करण्यात येतील. दोषींवर निश्चित कारवाई केली जाणार असून कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अशा घटनांना आळा घालण्यासाठी अशा पद्धतीने परवानग्या देण्यात आलेल्या इमारतींचे तत्काळ सुरक्षा ऑडिट करण्यासह विनापरवानगी करण्यात आलेली व सुरू असलेली बांधकामे युद्धपातळीवर तोडण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.