Breaking News

संगमनेरात ‘स्वच्छ सर्व्हेक्षण’ अंतर्गत महिलांची प्लॅस्टीक मुक्त रॅली उत्साहात


संगमनेर प्रतिनिधी - नगरपालिकेच्यावतीने शहरात ‘स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८’ अंतर्गत संगमनेर स्वच्छतेचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. यासाठी स्थानिक नागरीकांचा मोठा सहभाग मिळत आहे. नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या पुढाकारातून शहरातील सर्व महिला मंडळांनी एकत्र येवून प्लॅटीक मुक्ततेसाठी भव्य रॅली काढली. यावेळी नगरपालिकेच्यावतीने २५ हजार कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
नगरपालिकेपासून सुरु झालेली ही रॅली मेन रोड, बाजार पेठ, नवीन नगर रोड, अभिवन नगर, नेहरु चौक अशा विविध भागात नेण्यात आली. यावेळी व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांना ‘स्वच्छ सर्व्हेक्षण’अंतर्गत नागरीकांना कापडी पिशवीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, उपाध्यक्ष नितीन अभंग, आरोग्य समिती सभापती डॉ. दानीश खान, नगरसेविका सोनाली शिंदे, रुपाली औटी, सुहासनी गुंजाळ, मनिषा भळगट, मेघा भगत, योगीता पवार, वृषाली भडांगे यांसह प्रकल्प प्रमुख रचना मालपाणी, माहेश्‍वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा शैला भंडारी, वंदना भंडारी, गोल्डन पर्ल ग्रुप, ज्योती कासट, अभिनव नगर महिला मंडळ अध्यक्षा निलीमा क्षत्रीय, इनरव्हील क्लब अध्यक्षा शुभलक्ष्मी बेलापुरकर, जगदिश महिला मंडळ अध्यक्षा लिलाबाई जोशी, सहस्त्रार्जुन क्षत्रिय मंडळ अध्यक्षा लीना क्षत्रीय, जैन महिला मंडळ अध्यक्षा ज्योती दर्डा, संयोत वैद्य, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर आदींसह विविध महिला मंडळाच्या सदस्या, अमृतवाहिनी इंनिनिअरींग कॉलेज, तंत्रनिकेतन, सह्याद्री महाविद्यालय, एसएमबीटी कॉलेजच्या विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ अंतर्गत शासनाच्या उपक्रमात संगमनेर नगरपरिषद सहभागी आहे. या अंतर्गत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिक पिशवी वापर करणाचा व्यावसायिकांकडून प्लास्टिक पिशवी जप्त करण्यात आल्या. प्लास्टिकचा वापर अत्यंत घातक आहे. अनावश्यक फेकले जाणारे पाण्याचे स्त्रोत प्लास्टिकमुळे प्रदूषित होतात. प्लास्टिकचे विघटन होत नाही तसेच प्लॉस्टीक खाल्ल्यामुळे जनावरांना वेळप्रसंगी जीव गमवावा लागतो. म्हणून प्लॅस्टीक वापर विरोधात महिलांनी भव्य रॅली काढून २५ हजार कापडी पिशव्या वाटल्या.

यावेळी नगराध्यक्षा तांबे म्हणाल्या, मुबलक व स्वच्छ पाणी असणार्‍या संगमनेरची सुरक्षित शहर म्हणून राज्यात ओळख निर्माण झाली आहे. ओला व सुका कचरा व्यवस्थापनात अनेक कुटुंबाचा समावेश आहे. त्यामुळे या स्वच्छता अभियानात जास्तीत जास्त महिलांनी स्त्रियांनी सहभाग घ्यावा. यावेळी विद्यार्थींनीनी स्वच्छतेच्या दिलेल्या घोषणांनी संगमनेर शहर दुमदुमून दिले.