दखल - भाजपच्या नेत्यांना झालंय तरी काय ?
मात्र, गुजरातच्या एका मंत्र्यांनी चक्क राहुल गांधींची बाजू घेत स्वपक्षालाच खडसावत घरचा आहेर दिला आहे. काँग्रेस इतरांच्या अंतर्गत बाबींमध्ये लुडबूड करत नाही. त्यामुळं भाजपनंही काँग्रेसवर दादागिरी करू नये, असं या मंत्र्यानं म्हटलं आहे. यामुळं सर्वांच्याच भुवया मात्र उंचावल्या आहेत. गुजरातचे मत्सपालन मंत्री पुरुषोत्तम सोलंकी यांनी काँग्रेसच्या अनेक बाबींचं उघडपणे समर्थन केलं आहे. गुजरातच्या पहिल्या टप्प्याचं मतदान संपलं आहे. दुसर्या टप्प्याचं मतदान आणखी चार दिवसांनी आहे, अशा परिस्थितीत सोलंकी यांनी स्वकीयांची जी कानउघाडणी केली आहे, त्यानं भाजपचीच अडचण वाढली आहे. निवडणुकीच्या या टप्प्यावर सोलंकी यांच्यावर कारवाई करता येत नाही, असं अवघड जागेचं दुखणं होऊन बसलं आहे.
भाजपकडून काँग्रेसवर नेहमीच घराणेशाहीचा आरपोप केला जातो. यावरुनही सोलंकी यांनी काँग्रेसची पाठराखण केली. हा काँगे्रसचा अंतर्गत प्रश्न असल्यानं भाजपनं यात हस्तक्षेप करू नये, असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच भाजपमध्ये कोणाला तिकीट दिले जावं किंवा कुणाला नाही याबद्दल राहुल गांधींनी आक्षेप घेतला का ? मग तुम्ही असं का करता, अशा शब्दांत त्यांनी भाजपला खडसावलं आहे. भाजपनं घराणेशाहीच्या मुद्दयावरुन काँग्रेसला लक्ष्य करावं का, या प्रश्नाला उत्तर देताना सोलंकी यांनी तसं करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
आपण माझ्याकडे पाहा, जो ताकदवान आहे, त्याला भाजप हातदेखील लावत नाही. मात्र, जो कमजोर आहे, लढू शकत नाही त्याच्याविरोधात दादागिरी केली जाते, असा आरोपही त्यांनी केला. घोघा विधानसभा मतदारसंघातून 1998 पासून सलग जिंकत आलेले आमदार सोलंकी यांनी पाच वर्षांनंतर त्यांच्या मुलाला राजकारणात लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. त्या वेळी भाजपला त्याच्या उमेदवारीचं समर्थन करावं लागेल. भाजपला भावनगरमधील नऊ जागा जिंकायच्या असतील, तर त्यांना माझ्या मुलाला तिकीट द्यावंच लागेल, अन्यथा मी निवडणूक प्रचार करणार नाही, असा धमकीवजा इशारा त्यांनी दिला आहे.
काँग्रेसच्या घराणेशाहीवर मोदी कायम टीका करतात. भाजपही टीका करतो. गुजरातमधील एका कार्यकर्त्यानं राहुल यांची आजी, आजोबा काय करीत होते, याचा तपशील दिला. त्यानंतर मोदी यांना त्यांचे आईवडील काय करीत होते, अशी विचारणा ट्वीटरवर केली. सामान्य कार्यकर्त्याच्या या टीकेकडं दुर्लक्ष करणं आवश्यक होतं. दुर्लक्ष करायचं नव्हतं, तर आईवडील काय करीत होते, याचं उत्तर दिलं असतं, तर फार काही बिघडलं नसतं.
पंतप्रधानांवर टीका करणं आता देशद्रोह मानला जायचं हे युग आहे. मोदी यांना टीका सहन होत नाही.
टीकेतील अर्धवट माहितीचं भांडवल करून त्यातून विरोधी पक्षाला पेचात पकडण्याइतकं कौशल्य मोदी यांच्याइतकं आणखी कुणाकडं असणार? माझी आई माझा देश आणि माझे वडील माझा देश असं भावनिक भाषणात सांगणं ठीक असलं, तरी त्यामुळं टीकेला ते दिलेलं उत्तर होत नाही. मोदी यांच्या इतर मागासवर्गीय असण्याबाबत मागं काही प्रवाद निर्माण झाले होते. आता तर भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिलेल्या नाना पटोले यांनीच मोदी यांच्या इतर मागासवर्गीय असण्याबाबत साशंकता व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ओबीसी असण्याबाबतच पटोले यांनी शंका घेतली आहे. शेतकरी प्रश्नावर आणि ओबीसीच्या मुद्दयांवर पंतप्रधान मोदींनी माझ्यासोबत वाद घातला होता, त्यामुळं खरंच ते मागास जातीचे आहेत का? याची गुजरातमध्ये जाऊन मी शहानिशा करणार आहे. त्याचबरोबर त्यांचं जात प्रमाणपत्रही मी तपासणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. खरं तर मोदी यांचं जातप्रमाणपत्र तपासण्याचा अधिकार पटोले यांना कुणी दिला, असा प्रश्न उपस्थित होतो.
त्यांना काय तक्रार करायची, ती त्यांनी संसदेकडं करायला हवी होती. फार तर वडनगरच्या तहसीलदारांकडून खातरजमा करून घ्यायला हवी; परतुं पटोले आता थेट मोदी यांनाच आव्हान द्यायला निघाले आहेत. मी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानं, पापाच्या व्यवस्थेपासून मोकळा झालो आहे. आता त्यांच्या पापाचं भांडं मी फोडणार आहे. गुजरात निवडणुकीत मोदींनी मागास जातीचा मुद्दा पुढं केल्यानंच मी राजीमाम्यासाठीही जाणिवपूर्वक कालचा दिवस निवडला.
अद्याप कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय मी घेतलेला नाही; पण 11 तारखेला राहुल गांधींसोबत गुजरातच्या प्रचारसभेत नक्कीच सहभागी होणार असल्याचंही नाना पटोले यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळं भाजपची डोकेदु:खी वाढणार एवढं नक्की. वेगळ्या विदर्भाचं बील पंतप्रधानांच्या दबावामुळंच संसदेत येऊ शकलं नसल्याची टीका त्यांनी केली आहे.
आपली खुर्ची वाचवण्यासाठी दानवे माझ्या राजीनाम्यावर बोलत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. केंद्रात पंतप्रधान मोदींच्या एककल्ली कार्यपद्धतीविरोधात आवाज उठवून, थेट राजीनामा देणारे नाना पटोले हे भाजपचे पहिले खासदार आहेत.